Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला – पटोले

नागपूर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असे असताना राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करीत जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत केली. यावरून पटोले विरुद्ध पटेल वाद चव्हाट्यावर आला असून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट कॉंग्रेसच्या पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप केला आहे.

विदर्भात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाना पटोले यांच्याशी असलेले राजकीय वैर सर्वश्रुत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्ह्यात भाजपशी युती केली. त्यामुळे अनेक पंचायत समित्यांमध्ये संख्याबळ अधिक असूनही नाना पातोलेंच्या जिल्ह्यात काँग्रेसला सत्तेबाहेर राहावे लागले. राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून अनेक वाद होऊन देखील अद्याप शाबूत असलेल्या महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद आता समोर येऊ लागले आहेत.
भंडाऱ्यात भाजपा व राष्ट्रवादीचा काँग्रेसला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होता. भाजपाने राष्ट्रवादीशी युती करत जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत करून काँग्रेसची कोंडी केली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाना पटोले यांच्याशी असलेले राजकीय वैर सर्वश्रुत असून राज्यात दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असताना येथे राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करणे अनेकांना खटकले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल हा वाद पुन्हा एकदा उघड झाला आहे. त्यामुळे नाना पटोलेंनी त्यावरून आपल्या ट्विटर हँडलवर ट्वीट करीत थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातत्याने कुरघोड्या सुरू असून मैत्रीचा हात पुढे करीत राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. याचा जाब त्यांना नक्कीच विचारणार असे नाना पटोले यांनी ट्वीट केले आहे.

Exit mobile version