Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नफ्याचे आमिष पडले महागात : साडेदहा लाखांची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत अहुजा नगरात राहणारे व्यावसायिक कैलास बजरंग परदेशी यांची तब्बल १० लाख ४२ हजार ६०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुरूवारी ६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आयात-निर्यातीचा व्यवसाय करणारे कैलास परदेशी यांना १४ मे २०२३ ते ६ जुलै २०२३ या दरम्यान वारंवार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधण्यात आला व क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. यामध्ये सुरुवातीला परदेशी यांच्या मोबाईल क्रमांकावर अक्रम खान, अमित आणि सुरेश या नावाच्या व्यक्तीचा फोन आला व फिर्यादीला त्यांच्या बँक खात्यावर ३९ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम स्वीकारल्यानंतर तेवढ्याच रकमेचे क्रिप्टो करंसी दिली व फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर पुन्हा संपर्क साधून क्रिप्टो करंसीमध्ये अजून गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देऊ, असे अमिष दाखविले व सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यात एकाच वेळी ५ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम स्वीकारली व त्यानंतर पुन्हा मनमित सिंग सोहेल, आशुतोष सोनी आणि करण सुरेश परदेशी या नावाच्या व्यक्तींनी व युपीआयवर पाच लाख ४२ हजार ६०० रुपये अशी एकूण १० लाख ४२ हजार ६०० रुपये ऑनलाईन स्वीकारण्यात आले. मात्र त्याच्या मोबदल्यात फिर्यादीस कोणतीही रक्कम अथवा क्रिप्टो करंसी परत केली नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परदेशी यांनी सायबर पोलिस ठाण्यात वरील व्यक्तींविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी ६ जुलै रोजी रोजी सायंकाळी ७ वाजता सायबर पोलिस ठाण्यात वरील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.

Exit mobile version