Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

क्रिकेट गौरवस्थळाची अक्षरशः दुर्दशा ; वस्तू चोरीला

 

मुंबई वृत्तसंस्था । भारतीय संघाने २०११मध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर, सर्वच वर्ल्डकप विजयांच्या आठवणी कायम ताज्या राहाव्यात यासाठी महापालिका आणि सहारातर्फे अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात ‘सहारा क्रिकेट गौरवस्थळा’ची निर्मिती करण्यात आली. मात्र, गौरवस्थळाची अक्षरश: दुर्दशा झाली असून १९८३, २००७ आणि २०११च्या वर्ल्डकप विजयाच्या आठवणी म्हणून ठेवलेल्या अनेक वस्तू चोरीला गेल्याचे कळते आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सात वर्षांपूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते उद्घाटन झालेले हे संग्रहालय प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद, देखभाल-दुरुस्ती सेवेत झालेली निष्काळजी यामुळे मरणशय्येवर असल्याचे दिसते. या संग्रहालयात १९८३, २००७ (टी-२०) आणि २०११च्या ऐतिहासिक वर्ल्डकप विजयाच्या आठवणी जपण्यात आल्या. यामध्ये विजयी संघाच्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली बॅट, बॉल, ग्लव्हज, स्टंप, क्रिकेटिंग किट आणि मैदानावरील टिपलेले क्षण प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून या क्रिकेट गौरवस्थळाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. अनेक मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे कळते आहे. सुरुवातीच्या काळात या गौरवस्थळाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, कालांतराने प्रेक्षकांची संख्या रोडावू लागली. परिणामी, या संग्रहालयाची जबाबदारी सोपवलेल्या कंत्राटदाराकडून वास्तूकडे दुर्लक्ष होऊ लागल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

संग्रहालयात सुरू झालेली पाणीगळती, उंदीर-घुशींचे साम्राज्य यांमुळे चार वर्षांतच संग्रहालयातील अनेक वस्तू सडू लागल्या आहेत. कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांच्या मेणाच्या पुतळ्यांची अवस्थाही वाईट असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, कंत्राटदार आपली जबाबदारी नीट पार पाडतो की नाही हे पाहणे पालिकेचे काम असताना पालिकेकडूनही निष्काळजी झाल्याची संतप्त प्रतिक्रिया क्रिकेट चाहत्यांमध्ये उमटते आहे. अंधेरीतील हे गौरवस्थळ म्हणजे मुंबईतील एकमेव छोटेखानी क्रिकेट संग्रहालय असल्याने अनेक क्रिकेटप्रेमी ते पाहण्यासाठी येत असतात. मात्र, बंद असलेले संग्रहालय पाहून त्यांच्याही पदरी निराशा पडते आहे.

Exit mobile version