Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर जाणुनबुजून बोलले जात नाही : राहुल गांधी

rahul gandhi

मुंबई, वृत्तसेवा | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर येथील चांदिवली येथे नसिम खान यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर जाणुनबुजून बोलले जात नाही असा त्यांनी यावेळी आरोप केला. शिवाय, भ्रष्टाचाराचा मुद्दा घेत पीएमसी बँकेच्या मुद्यावरही मोदींनी बोलावे असेही त्यांनी आव्हान केले.

चांदिवली येथे  येथील सभेत राहुल पुढे म्हणाले की, मोदीजी, फडणवीसजी जरा बेरोजगारीबद्दल दोन शब्द तरी बोला, उद्योग बंद होत आहेत त्याबद्दल बोला, शेतकरी आत्महत्येबद्दल दोन शब्द तरी बोला.. मात्र ते याबाबत बोलणार नाहीत. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींना घेरत राहुल यांनी त्यांनी निदान ‘पीएमसी’ बँकेबाबत तरी बोलावे, असे देखील आवाहन केले. त्या बँकेचे संचालक कोण होते? कोणाचे नातेवाईक होते? किती जणांचे नुकसान झाले? किती जणांना पैसा दिला गेला? यावर त्यांनी बोलावं अस देखील यावेळी राहुल म्हणाले. इंग्रज देशाला लुटत होते तसं भाजप गरीबांचे पैसे चोरून श्रीमंतांना देते आहे. भारतातील गरिबांचा पैस हिसकावून तो देशातील सर्वाधिक श्रीमंताना द्यायचा व देशातील जनतेचे लक्ष सातत्याने भरकटवत राहायचे ही त्यांची पद्धत आहे, असा आरोप राहुल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला. तसेच, २०१४ मध्ये ‘मेक इन इंडिया’चा त्यांनी नारा दिला होता. मात्र सध्या सगळीकडे मेड इन चायना दिसत आहे. देशभरातील कोट्यावधी युवक बेरोजगार आहेत. मात्र पंतप्रधान चीनच्या राष्ट्रध्यक्षांबरोबर चहा पिण्यात मग्न आहेत. देशाची ताकदच यांनी संपवली आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या तीन सभा होणार आहेत. यातील पहिली लातूर जिल्ह्यातील औसा येथे पार पडली आहे. दुसरी चांदिवली येथे झाली आहे व तिसरी धारावी येथे होणार आहे.

Exit mobile version