Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरकारने आरबीआयला पुढे करून लपू नये- सुप्रीम कोर्टाने सुनावले

नवी दिल्ली वृत्तसंस्था । बँकांनी सुरू असलेल्या व्याज वसुलीवरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारची कानउघाडणी करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पुढे करून सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, अशा शब्दांत सुनावले आहे.

३१ ऑगस्टपर्यंत ग्राहकांकडून सामान्य दरानं व्याजाची वसुली करण्याची परवानगीदेखील बँकांना देण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या या धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. व्याज माफ करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली. याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारची कानउघाडणी केली. आरबीआयच्या मागे लपून केंद्र सरकार जबाबदारी टाळू शकत नसल्याचं न्यायालयानं म्हटले.

सरकारला आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत राहून निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. ईएमआयवर बँका करत असलेली व्याज वसुली रोखण्याचे अधिकार सरकारला आहेत. मात्र सरकार ते वापरत नाही,फ अशा शब्दांत न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. त्यावर महाधिवक्ते तुषार मेहतांनी सरकारची बाजू मांडली.

सरकार आरबीआयसोबत काम करत असून कर्जदारांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारचा दृष्टीकोन आरबीआयपेक्षा वेगळा असू शकत नाही, असा युक्तिवाद मेहतांनी केला. न्यायालयानं या प्रकरणी आठवड्याभरात शपथपत्र सादर करण्याचे आदेश केंद्राला दिले आहेत.

Exit mobile version