Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुलींनी आईच्या पार्थिवाला दिला खांदा व अग्नीडाग !

एरंडोल रतीलाल पाटील । आजच्या युगात मुलगा व मुलगीत कोणताही भेद नसल्याचे उदाहरण तालुक्यातील तळई येथे आज दिसून आले आहे. तळईतील एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मुलींनी खांदा व अग्नीडाग देऊन समाजा समोर समतेचा संदेश दिला.

एरंडोल तालुक्यातील तळई येथील कमलाबाई इच्छाराम महाजन (वय ७०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. यानंतर त्यांच्या सात मुलींनी आईच्या पार्थिवाला स्वतः खांदा दिला व अग्नी डागही दिला. तळई या गावी इच्छाराम महाजन हे शेती व्यवसाय व विहीर बांधणीचे काम करुन आपला परिवार चालवत होते.त्यांना सात मुली झाल्या व मुलगा झाला नाही. त्या सातही मुलींना इच्छाराम महाजन व स्व.कमलाबाई महाजन यांनी काबाड कष्ट करून मोठं केलं. सातही मुलींचे चांगल्या घरात लग्न करुन दिलं.

दरम्यान, आज दि २० ऑगस्ट २०२० रोजी कमलाबाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ठिकाणी रंजनाबाई माळी, सुशिला पाटील,अंजना महाजन,अश्‍विनी महाजन, आशा महाजन,वैशाली महाजन, संगिता महाजन या सात बहिणी एकत्र आल्या. आईच्या मृत्यूच्या दुःखात खचून न जाता जावई तुकाराम महाजन,वसंत पाटील,चंद्रकांत महाजन,अविनाश सुर्यवंशी,नटराज महाजन,महेंद्र महाजन यांच्या पुढाकाराने व गावातील सरपंच प्रकाश महाजन,समाधान पाटील,देविदास महाजन, इच्छाराम महाजन यांनी मुलींना अग्निडाग व खांदा देण्यासाठी प्रोत्साहन दिले.

या अनुषंगाने परंपरा मोडीत काढत सहा मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला. तर लहान मुलगी संगिता महाजन हिने अग्निडाग दिला. यामुळे या सर्व भगिनींचे कौतुक केले जात आहे.

Exit mobile version