Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठी भाषा आणि संस्कृतीचे शत्रू आपल्या घरातच आहेत : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतून करण्याच्या निर्णयाला विरोध करणार्‍यांना आज शिवसेनेने सुनावले असून मराठी युध्दाचा इतिहास समजून घेण्याचा सल्ला दिला आहे. तर मराठी भाषा आणि संस्कृतीचे शत्रू आपल्या घरातच असल्याचे सांगत जोरदार हल्लाबोल देखील केला आहे.

राज्य मंत्रीमंडळाने नुकताच राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतून असाव्यात असा निर्णय घेतला असून याला विरोध होऊ लागला आहे. यावर आज शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनात भाष्य करण्यात आले आहे. या अग्रलेखात म्हटले आहे की, मराठी भाषा आणि संस्कृतीचे शत्रू आपल्या घरातच आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. मराठी पाट्यांची सक्ती करण्याची गरज काय, इथपासून ते आम्ही हे होऊ देणार नाही इथपर्यंत प्रकरण पोहोचले आहे. मुंबईतील भाजपधार्जिणा असा व्यापारी संघटनेचा अध्यक्ष तर मराठी पाट्यांसंदर्भात आव्हानाची भाषा करतोय. धमक्या देतोय व समस्त भाजपवाले त्यावर पाठीमागची शेपूट सरळ तोंडात काींबून गप्प बसले आहेत. मुंबईतील गृहसंकुलात मराठी माणसांना घर नाकारणारे व मराठी पाट्यांना विरोध करणारे एकाच राजकीय जातकुळीतले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, राज्याचे अध्यक्ष दादाजी पाटील यांचे मराठी पाट्यांबाबत काय मत आहे? की जे कोणी व्यापारी संघटनेचे भाजपपुरस्कृत पुढारी विरोध करीत आहेत त्यांना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवावी, म्हणून ते मागणी करणार आहेत? मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे व मराठीचा सन्मान राहिलाच पाहिजे, अशी भूमिका घेणे यात काय चुकले? असा प्रश्‍न यात विचारला आहे.

यात पुढे म्हटले आहे की,  मराठीच्या प्रश्नांवर संमेलने, लढे करायचे व रोज डोळयांसमोर मराठी पायदळी तुडवली जाताना पाहायचे. त्या तुडवातुडवीस कोणी राष्ट्रीय एकात्मता म्हणत असतील तर ती एकात्मता त्यांची त्यांनाच लखलाभ ठरो. देशात संविधानानुसार भाषिक राज्ये निर्माण झाली आहेत. मुंबईसह महाराष्ट्र हे  मऱहाटी राज्य तर झगडून आणि रक्ताचे शिंपण करून मिळवले आहे.

यात पुढे नमूद केले आहे की, दक्षिणेकडील राज्यांत गेलात तर संवाद आणि संपकाचे वांधेच होतात.  महाराष्ट्रात मराठी पाट्यांबाबत उलटसुलट भाषा करणार्‍या महाभागांनी चेन्नई, बंगळुरू, हैदराबादेत अशी भाषा करण्याचे धारिष्टय दाखवून पाहावे. संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी तर मूर्खासारखे वक्तव्य केले आहे. मराठी पाट्यांचा खर्च सरकारने करावा असे ते म्हणतात. त्यांच्या ङ्गएमआयएमम पक्षाचे मुख्यालय हैदराबादेत आहे. तेथील उर्दू पाट्यांचा खर्च आंध्र सरकारने पेलला आहे काय, एवढेच त्यांनी सांगावे.  मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठीजनांच्या प्रश्नांवर शिवसेनेने फक्त लढेच दिले नाहीत, तर वेळोवेळी हुतात्मेही दिले. मराठी प्रश्नी पोपटपंची करणारे खूप निपजले, पण आजही शिवसेना हीच मराठीजनांची आधार आहे.

यात शेवटी म्हटले आहे की, सर्वच भाषिक राज्यांत त्या त्या  मातृभाषिक शाळांसमोर मराठीइतकेच संकट उभे आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे व प्रत्येक स्तरावर मराठी भाषा सक्तीची व्हावी हाच त्यावरचा एक उपाय आहे. ज्ञानेश्वरांपासून शिवाजी महाराजांपर्यंतच्या महान विभूतींची मराठी भाषा अमर आहे. मराठी ही श्रमिकांची, कष्टकर्‍यांची, तशी योद्धयांची भाषा आहे. स्वाभिमानाने लढणार्‍यांची ही भाषा देशाला प्रेरणा देत राहिली आहे व देत राहील. मराठी पाट्यांना विरोध करणार्‍या नतद्रष्टांनी  मराठीचा युद्ध इतिहास समजून घ्यावा. नंतर मराठी विरोधकांच्या गोवर्‍या मसणात रचल्यावर रडगाणी गाऊ नयेत! असे या अग्रलेखात म्हटले आहे.

 

 

Exit mobile version