Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काश्मीरमध्ये सात दहशतवाद्यांचा खात्मा

 

 

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील शोपिया, बांदीपोरा आणि सोपोरमध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये भारतीय जवानांनी सात दहशतवाद्यांना ठार केले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या एका कमांडरचाही समावेश आहे. काही भागांमध्ये अजूनही चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी बचावासाठी एका १२ वर्षीय मुलाला ओलीस ठेऊन नंतर त्याची हत्या केल्याने खोऱ्यात खळबळ उडाली आहे.

 

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत सात दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं आहे. या चकमकीत सात जवानही जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बांदीपोरा जिल्ह्यातील मीर मोहल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. यापैकी एक दहशतवादी मोस्ट वॉन्टेड होता. अनेक नागरिकांच्या हत्या त्याने घडवून आणल्या होत्या. आम्ही दोघांकडूनही मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे, असे बांदीपोरा येथील विशेष पोलीस अधीक्षक राहुल मलिक यांनी सांगितले आहे.
दहशतवाद्यांनी एक १२ वर्षीय मुलगा व अन्य एका ६० वर्षीय व्यक्तीला ओलीस ठेवले होते. यापैकी मुलाला वाचवण्यात जवानांना यश आले नाही. मुलाच्या सुटकेसाठी त्याचे आई-वडील दहशतवाद्यांपुढे वायरलेस मेसेजद्वारे विनवण्या करत होते मात्र, कोणतीही दयामाया न दाखवता दहशतवाद्यांनी या निष्पाप मुलाची हत्या केली. या चकमकीनंतर सोपोरमधील शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आली असून मोबाइल आणि इंटरनेट सेवाही तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

Exit mobile version