Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा पोलीस दलास उद्या मिळणार वाहनांचा ताफा; पालकमंत्री यांच्याहस्ते लोकार्पण

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना ताफा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्या शुक्रवार २ एप्रिल रोजी सुपूर्द करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. 

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या ही खूप कमी आहे. यातच सध्याची अनेक वाहने ही जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी ही डोकेदुखी ठरत असते. याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी  पोलीस दलासाठी नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांची आवश्यकता असल्याची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. याला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार पालकमंत्र्यांनी तत्काळ होकार दिला होता. मध्यंतरी कोविडच्या आपत्तीमुळे अन्य कामांच्या खर्चावर मर्यादा होती. ही मर्यादा दूर झाल्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी वाहन खरेदीला मंजुरी मिळवून दिली होती.

जिल्हा नियोजन समितीने दिनांक २४ जानेवारी २०२१ रोजी २९ महेंद्रा बोलेरो (बीएस-४) आणि ७० होंडा शाईन दुचाकींना खरेदीची मंजुरी दिली होती. यासाठी २ कोटी, ३० लक्ष, ९६ हजार, ४७८ रूपयांची तरतूद करण्यात आली होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ही वाहने २ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता सुपूर्द करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात आयोजीत करण्यात आलेला आहे.  पोलीस दलात वाहनांचा नवीन ताफा दाखल होणार असल्यामुळे विविध गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

महिला रूग्णालयाची पाहणी

दरम्यान, जिल्ह्यातील कोविड रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मोहाडी रोडवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने उभारण्यात आलेल्या महिला महाविद्यालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येणार आहे. या संदर्भात सुरू असणार्‍या कामांचा आढावा घेण्यासाठी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री ना. पाटील हे या हॉस्पीटलची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प कोरोनाग्रस्तांसाठी उपयोगात येणार आहे. या पाहणी प्रसंगी पालकमंत्र्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आणि सार्वजनीक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता श्रेणी-१ सुभाष राऊत   हे उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version