Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रात्री शेतातच झाली प्रसूती; वैद्यकीय पथकाने महिलेसह वाचविले जुळ्या बाळांनाही

जळगाव प्रतिनिधी | काळ आला होता पण वेळ आली नव्हती… शेतात असताना अचानक गर्भवती महिलेला कळा सुरु… ग्रामीण भाग असल्याने कुटुंबीयांची धावपळ… मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच महिलेची प्रसूती सुरु… महिलेच्या वेदनांनी आसमंत हादरले… रात्रीची बिकट वेळ… महिलेने चक्क जुळ्या बाळांना दिला जन्म… त्याचवेळी बाळांचेही शिशुरूदन सुरू…पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रसंगातून अतिरक्तस्राव होऊनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या अथक परिश्रमानंतर तिचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

केवलबाई साहिदास भिल (वय २६, रा.उखडवाडी ता. धरणगाव) असे या महिलेचे नाव आहे. त्यांचे कुटुंब मजुरी करते. या महिलेची प्रसूतीची हि चक्क पाचवी वेळ होती. यापूर्वी २ मुली व २ मुले तिला आहेत. पाचव्या प्रसूतीमध्ये तिला दोन्ही मुली झाल्या आहेत. दि.५ जानेवारी रोजी कुटुंबियांसह शेतात असताना केवलबाईला प्रसूतीकळा सुरु झाल्या. कुटुंब हालचाल करून वाहन आणतील तत्पूर्वीच महिलेची प्रसूती सुरु झाली.

शेतातच सदर महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र प्रसूतीमुळे महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक होऊन बेशुद्ध झाली. कुटुंबीयांनी थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिला रात्री ९ वाजेच्या सुमारास दाखल केले. महिलेचे हृदयाचे ठोकेदेखील लागत नव्हते. खूप रक्तस्राव झाल्याने प्रकृती चिंताजनक होती. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे, सहयोगी प्रा. डॉ. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जितेंद्र कोळी, डॉ. कांचन चव्हाण यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव वाचविण्यासाठी गर्भपिशवी काढली. यामुळे महिलेचा जीव वाचला.

महिलेला ६ रक्ताच्या पिशव्या आणि २ पांढऱ्या पेशींच्या थैल्या लावण्यात आल्या. चार दिवस अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतर रविवारी जनरल कक्षात या महिलेला वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवले आहे. समयसूचकता ठेवून महिलेचा जीव वाचविणाऱ्या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी कौतुक केले आहे. उपचार करण्याकामी डॉ. शलाका पाटील, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. चंदन महाजन, डॉ. राजश्री येसगे, डॉ. विनेश पावरा, बधिरीकरण विभागाचे डॉ. हर्षद, डॉ. स्वप्नील इंकने, शस्त्रक्रियागृह इन्चार्ज परिचारिका सोनाली पाटील, अतिदक्षता विभागाच्या इन्चार्ज परिचारिका राजश्री आढाळे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version