Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देश संकटात, पण नक्की मार्ग निघेल – गावस्कर

sunil gavskar

मुंबई, वृत्तसंस्था | “देश संकटात आहे, पण सध्याच्या या संकटातून आपण नक्की बाहेर पडू. कारण, यापूर्वीही देशवासीयांनी संकटातून मार्ग काढला आहे,” अशा शब्दात माजी महान फलंदाज सुनिल गावस्कर यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचारावर आपली प्रतिक्रिया नोंदवली.

 

शनिवारी लाल बहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी बोलताना, “देश संकटात आहे. देशातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी शिक्षण घेणे, अभ्यासात रमणे महत्त्वाचे आहे. आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात काही विद्यार्थी जखमी झाले. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यात याच विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. आपण एकजूट असू, तरच आपण पुढे जाऊ शकू. खेळाने आम्हाला हेच शिकवले की, एकत्र प्रयत्न केल्यावर आपण जिंकतोच. यापूर्वी भारताने बर्‍याच संकटांवर मात केली. त्यामुळे यावरही मात करेल आणि एक सामर्थ्यवान देश बनेल. आपण सर्व सामान्य भारतीय आहोत. खेळ आपल्यालाच हीच भावना शिकवते”. असे गावस्कर म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात अनेक ठिकाणी सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलने होत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर जेएनयूमध्ये हिंसाचार उसळला. त्याच्या निषेधार्थ देशभरातील विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले. या सर्व घडामोडींवर बोलताना गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Exit mobile version