Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कॉंग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी : शिवसेना

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉंग्रेस पक्षाची अवस्था ही आभाळ फाटल्यासारखी झाली असून त्यांना लागलेल्या गळतीबाबत आज शिवसेनेने चिंता व्यक्त केली आहे.

शिवसेनेच मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखात कॉंग्रेसवर भाष्य करण्यात आले आहे. यात नमूद केले आहे की, कॉंग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. ठिगळ तरी कोठे लावायचे? पंजाबमधील कॉंग्रेसचे नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्या चिंतन शिबिराची मांडव परतणी सुरू असतानाच कॉंग्रेसला ही अशी गळती लागली. गेल्या काही काळापासून ‘गळती’ हा प्रकार कॉंग्रेसला नवीन राहिलेला नाही, पण सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनीच कॉंग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी ‘हाक’ दिली असतानाच नव्याने गळतीला आरंभ व्हावा हे चिंताजनक आहे.

यात पुढे नमूद केले आहे की, पंजाबचे सुनील जाखड व हार्दिक पटेल बाहेर का पडले यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. बलराम जाखड हे कॉंग्रेस पक्षाचे एकेकाळचे दिग्गज नेते, गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू. बलराम लोकसभा अध्यक्षही झाले. सुनील जाखड हे त्याच बलरामांचे चिरंजीव. पंजाब कॉंग्रेसचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले, पण नवज्योत सिद्धूला फाजील महत्त्व मिळाल्याने जाखड बाजूला फेकले गेले. त्याच जाखड यांनी शेवटी भारतीय जनता पक्षाची वाट धरली. माधवराव शिंदे, जीतेंद्र प्रसाद व बलराम जाखड या तीनही नेत्यांना कॉंग्रेसने भरभरून दिले. त्यांच्या मुलांचेही कल्याण करण्यात कॉंग्रेसने कधी हात आखडता घेतला नाही. ज्योतिरादित्य, जितीन प्रसाद व सुनील जाखड या तिघांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पित्यांपेक्षा मोठ्या निघाल्या. कॉंग्रेस पक्ष त्या तुलनेत छोटा ठरल्याने तिघांनीही कॉंग्रेसचा त्याग केला. संकटकाळात या तिघांची गरज असताना त्यांनी कॉंग्रेस सोडली. हे नेतृत्वाचेही अपयश म्हणावे लागेल.

यात म्हटले आहे की, कॉंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही व उदयपूरच्या चिंतन शिबिरात त्यावर चर्चा झाली, पण नेतृत्वाचा प्रश्न अधांतरी ठेवून चिंतन शिबीर संपवले गेले. चिंतन शिबिरात काही निर्णय झाले. ‘एक व्यक्ती एक पद’ वगैरे घोषणा झाल्या. घराणेशाहीलाही विरोध झाला, पण जाखड यांच्या पाठोपाठ गुजरातच्या हार्दिक पटेलनेही कॉंग्रेस सोडली. ज्या राज्यांत आता निवडणुका आहेत, त्या राज्यांत जनसंपर्क असलेल्या नेत्यांना तरी कॉंग्रेसने सांभाळले पाहिजे.    हार्दिक पटेल हा तरुण नेता कॉंग्रेसमध्ये आला तेव्हा गुजरात कॉंग्रेसला बहार येईल असे वाटले होते, पण हार्दिकला राज्याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कामच करू दिले जात नव्हते. हातपाय बांधून शर्यतीत उतरवले असे हार्दिक पटेल याचे सांगणे आहे. हार्दिकने जाता जाता राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय.

यात शेवटी म्हटले आहे की, कॉंग्रेस दिशाहीन पक्ष आहे. कॉंग्रेसकडे दूरदृष्टीचा अभाव आहे, असे हार्दिक पटेल याचे म्हणणे आहे. कॉंग्रेसने देशभर ६५०० पूर्णकालीन कार्यकर्ते नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, पण उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांना प्रदेशाध्यक्ष नाहीत. या दोन मोठ्या राज्यांच्या नेतृत्वाशिवाय उदयपूरचे चिंतन शिबीर झाले. सोनिया गांधी यांचे वय आणि प्रकृती याबाबत अनेकांना चिंता वाटते. अर्थात, कॉंग्रेसचे नेतृत्व त्या तरीही करतात व त्यांचाच शब्द प्रमाण मानला जातो. राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी सोडले. त्याच कारणास्तव राज्या-राज्यांतील अनेक नेते कॉंग्रेस सोडताना दिसत आहेत. २०२४ ची तयारी मोदी व त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करीत असताना कॉंग्रेसमधील ‘गळती’ हंगाम सुरूच आहे आणि त्या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झाली आहे. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरे नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी?, असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

 

Exit mobile version