Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्र्यांनी दिले बकाले आणि लोही यांच्या चौकशीचे आदेश !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करावे आणि चाळीसगाव शहरातील आरटीओ वसुली प्रकरणी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकाले याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक यांना दिले आहेत. शिवाय सर्वसामान्य ट्रक व वाहन चालक यांच्याकडून हफ्ते घेणाऱ्या चाळीसगाव येथील आरटीओ वसुली प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांनी आरोप केलेले राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही तसेच त्यांना अभय देणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी- कर्मचारी यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही आदेश मुख्यमंत्री यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांना दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे आरटीओ यांना हफ्ता देणाऱ्या १०० ट्रक व वाहन चालकांची यादी दिली असून त्यांचा जबाब घेतला जाणार आहे.

दरम्यान, आपली ही लढाई ही कुठल्या व्यक्ती अथवा जाती विरोधात नसून अन्यायी, भ्रष्टाचारी व जातीयवादी प्रवृत्तीविरोधात आहे. या प्रवृत्तीमुळे गोर-गरीब, वंचित, पिडीत घटक यांच्यावर अन्याय होतो, त्यांचे शोषण होते. त्यामुळे यांना धडा शिकविण्यासाठी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरु राहील. अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.

Exit mobile version