Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साने गुरुजींच्या हस्ताक्षरातील छात्रालय दैनिकाचे आकर्षण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पूज्य साने गुरुजींनी 100 वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले हस्ताक्षरातील ‘छात्रालय दैनिक’ साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आकर्षण ठरले आहे. विशेष म्हणजे साने गुरुजींनी स्वतःच्या हस्ताक्षरात त्यावेळी लिहिलेले दैनिक आजही पाहायला मिळत आहे.

जुलै 1923 मध्ये पूज्य साने गुरुजी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अमळनेरमध्ये आले. महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्यातील कलागुण आणि कौशल्य पाहून श्रीमंत प्रताप शेठ यांनी साने गुरुजींना शिक्षकाची नोकरी दिली. 1924 ते 30 पर्यंत साने गुरुजींनी शिक्षक म्हणून नोकरी केली.

शिक्षकाची नोकरी करत असतानाच साने गुरुजीनी विद्यार्थ्यांसाठी छात्रालय दैनिक सुरू केले. त्यावेळी विद्यार्थी दैनंदिनी लिहित. त्या दैनंदिनीचा साने गुरुजी अभ्यास करीत, नंतर त्याचा सार काढून लिहित. ते दैनिक त्यावेळी लोकप्रिय झाले होते.
साने गुरुजींनी 100 वर्षांपूर्वी हस्ताक्षरात लिहिलेले दैनिक आजही पाहायला मिळते. 1930 च्या लाहोर अधिवेशनाच्या प्रचारासाठी साने गुरुजींनी अमळनेरमधील शिक्षकाची नोकरी सोडली.

साने गुरुजींच्या हस्ताक्षरातील दैनिकाच्या मूळ प्रतीच्या साक्षांकित प्रती आजही प्रताप विद्यालयात उपलब्ध आहेत, अशी माहिती मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रमेश माने यांनी दिली.

Exit mobile version