Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बस वाहकाला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्यास दोन वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा

जळगाव प्रतिनिधी । बस प्रवासात अर्धे तिकीटाचे कार्ड नसतांना अर्धे तिकीट काढून बस वाहकाला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी प्रवाश्याला दोन वर्ष सक्तमजूरी व दहा हजार रूपयांची दंडाची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली आहे.

तुळशीराम हरलाल राठोड (वय ६५, रा. विसापूर, ता. चाळीसगाव) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर घटना अशी की, २१ सप्टेबर २०१८ रोजी तुळशीराम हरलाल राठोड हा चाळीसगाव-मालेगाव बसमध्ये (एमएच १९ बीटी १३४२) बसला होता. बसमध्ये चालक  महेश देवचंद चव्हाण हे कामावर होते.  वाहक महेश चव्हाण यांनी तिकीटासंदर्भात प्रवाशी तुळशीराम राठोडला विचारणा केली असता अर्धे तिकीटासाठी लागणारे एसटी महामंडळाचे किंवा पुरावा म्हणून काहीही नसतांना राठोडने अर्धे तिकीट मागितले. अर्धे तिकीटासाठी लागणारे कार्ड जवळ नसल्यामुळे पुर्ण तिकीट काढावे लागेल असे वाहक चव्हाण यांनी राठोडला सांगितले. याचा राग आल्यामुळे राठोडाने धावत्या बसमध्ये पायातील चप्पल काढून वाहक चव्हाण यांना मारहाण केली व शिवीगाळ केली.  ‘तुझ्याकडून काय होते ते करुन घे’ असे म्हणत धमकी दिली होती. या प्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राठोडच्या विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात दोषारोप सादर झाल्यानंतर न्यायाधीश एस. एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. यात सरकारपक्षाने एकुण ८ साक्षीदार तपासले. युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने तुळशीराम राठोड याला दोषी धरुन  दोन वर्ष सक्तमजूरी व दहा हजार रूपयांची दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड. रमाकांत सोनवणे यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version