Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चीनमध्ये ब्युबोनिक प्लेग फैलावला

 

बीजिंग: वृत्तसंस्था । कोरोनाच्या संसर्गापासून सुटका होत असताना चीनमध्ये ब्युबोनिक प्लेग फैलावला आहे. दक्षिण-पश्चिम भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. एका तीन वर्षाच्या मुलाला प्लेगची लागण झाली आहे. हा बालक युन्नान प्रांतातील मेंघाई काउंटी येथे राहणारा आहे. मागील आठवड्यात प्लेग फैलावत असल्याचे समोर आले होते. रविवारी मात्र, याची पुष्टी करण्यात आली.

प्लेगची बाधा झालेल्या मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. प्लेग बाधेचे रुग्ण समोर आल्यानंतर चिनी प्रशासनाकडून या भागात चौथ्या स्तरावरील आणीबाणी जारी करण्यात आली. कोरोना प्रमाणे हा आजारही फैलावू नये यासाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी युन्नान प्रांतात प्लेगची बाधा झालेले तीन उंदीर मृताव्यस्थेत आढळले होते.

मेंघाई येथील शिडिंग गावात उंदीरांचा सुळसुळाट झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात उत्तर मंगोलियात प्लेग फैलावण्याचे समोर आले होते. त्यानंतर देशभरात तिसऱ्या पातळीवरील इशारा जाहीर करण्यात आला. मंगोलियात प्लेगचे २२ संशयित रुग्ण आढळले होते . यातील सहाजणांना लागण झाली असल्याचे समोर आले होते.

ब्यूबोनिक प्लेग हा जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. या संसर्ग जीवघेणाही ठरू शकतो. उपचारासाठी अॅण्टीबायोटिकही उपलब्ध आहे. तिसऱ्या पातळीवरील इशारा जाहीर करण्यात आल्यानंतर प्लेगचा फैलाव करणाऱ्या प्राण्यांच्या खाण्यावर बंदी घातली जाते. त्याशिवाय लक्षणे आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले जातात. जगभरात ब्यूबोनिक प्लेगचे रुग्ण आढळत असतात. मादागास्करमध्ये २०१७ मध्ये ब्यूबोनिक प्लेगचे ३०० हून अधिक रुग्ण आढळले होते.

मागील वर्षी मंगोलियात ब्यूबोनिक प्लेगमुळे दोघांचा मृत्यू झाला होता. या बाधितांनी कच्चे मांस खाल्ले असल्याचे समोर आले होते. उंदीर आणि खारीच्या माध्यमातून विषाणू मानवाच्या शरीरात पसरतात. ब्यूबोनिक प्लेग झाल्यामुळे अचानक ताप येणे, डोके दुखी, थंडी, थकवा जाणवणे आदी लक्षणे जाणवतात. अंगावर एका ठिकाणी अथवा अनेक ठिकाणी सूज येते.

Exit mobile version