Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा सरकार म्हणजे ‘नापास’ विद्यार्थ्यांचा ‘वर्ग’- अनंत गाडगीळ

मुंबई- अर्थव्यवस्था सावरायची प्राथमिक जबाबदारी अर्थमंत्र्यांची असल्यामुळे या परीक्षेत अर्थमंत्री ‘नापास’ झाल्याचे सिद्ध झाले आहे. संघाच्या ‘वर्गात’ वाढलेल्यांनी निदान या परिक्षांची तरी ‘नीट’ तयारी करावी, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

भाजपा सरकारचा समाचार घेताना गाडगीळ म्हणाले, स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा देशाची विकासवाढ २४ टक्क्यांनी घसरली आहे. एकीकडे सर्वात अपयशी अर्थमंत्री, असे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले असतानाही दुसरीकडे अशा गंभीर व धक्कादायक बाबीवर काही प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक गप्प आहेत. हेरगिरी करताना अमेरिकेत पकडलेल्या अॅलन हो या चिनी हेराला ज्या ‘बँक ऑफ चायना’ मधील एका गुप्त खात्यातून पैसे पूरविल्याचा अहवाल एफबीआयने दिला त्याच बँकेला मुंबईतील बीकेसीमध्ये कार्यालय उघडण्यास परवानगी देणे यात केंद्रीय गृह खात्याचा बेजबाबदारपणा दिसून येतो.

भारताचा आत्तापर्यंत मित्र राहिलेले उत्तरेकडील नेपाळ राष्ट्र हळूहळू चीनकडे सरकत आहे, पूर्वेकडे भुतान व बांगलादेशाला चीन चुचकारु लागला आहे, दक्षिणेकडे श्रीलंकेत चिनी नौदलाचा तळ उभारला जात आहे, पश्चिमेकडे इराणने अब्जावधी रुपयांच्या रेल्वेमार्गाचे काम भारताकडून काढून घेत चीनला दिले. यावरून मित्र राष्ट्रांसोबत योग्य धोरण राबविण्यात परराष्ट्रमंत्री अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट होते.

जीडीपी घसरणीत उच्चांक, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत उच्चांक, थोडक्यात अर्थ, आरोग्य, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह अशा सर्व आघाड्यांवर अपयशी ठरणारे केंद्रातील भाजपा सरकार म्हणजे ‘नापास’ विद्यार्थ्यांचा ‘वर्ग’ झाला आहे. संघाच्या ‘वर्गात’ वाढलेल्यांनी निदान या परिक्षांची तरी ‘नीट’ तयारी करावी अशी खरमरीत टीका अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

Exit mobile version