Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हल्लेखोर आदिलला सहा वेळा झाली होती अटक

श्रीनगर (वृत्तसंस्था) पुलवामात सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला सहावेळा अटक करण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे. सप्टेंबर २०१६ ते मार्च २०११८ या कालावधीत दहशतवादी आदिल अहमद दार याला सहावेळी अटक झाली होती. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाला मदत आणि दगडफेकप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र त्याच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यानं त्याला सोडून देण्यात आले होते.

आदिल पुलवामा जिल्ह्यातल्या गुंडीबाग जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याला गेल्या दोन वर्षात सहावेळा अटक करण्यात आली होती, अशी माहिती गुप्तचर विभाग आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिली. आदिलवर सुरक्षा यंत्रणांनी नजर ठेवण्याची गरज होती, असं अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गुप्तचर विभागाचा हलगर्जीपणा ४० जवानांच्या जीवावर बेतला का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आदिल अहमद दारविरोधात कधीही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती आयबी आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिली. आदिल २०१६ पासून दहशतवादी कारवाया करत होता. दहशतवाद्यांना लपवण्याचं काम आदिल करायचा. दहशतवादी संघटनेचं कमांडर आणि या संघटनांकडे आकर्षित होणारे तरुण यांच्यातला मध्यस्थ म्हणून तो काम पाहत होता. आदिलच्या कुटुंबातील काहींचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘जैश-ए-मोहम्मद’मध्ये सहभागी होण्यापूर्वी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी आदिलला दोनवेळा अटक करण्यात आली होती. याशिवाय दहशतवाद्यांना सहकार्य केल्याच्या आरोपाखाली त्याला चार वेळा अटक करण्यात आली होती, असंही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version