Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

येत्या १९ डिसेंबरला आशा फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक परिषदेचे आयोजन

parishad

 

जळगाव प्रतिनिधी । शिक्षण क्षेत्रात नेहमीच आगळे वेगळे उपक्रम राबविणाऱ्या आशा फाऊंडेशन या शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे
येत्या १९ डिसेंबर रोजी एक दिवसीय उत्तर महाराष्ट्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. “शिक्षण : का ? व कशासाठी” या विषयावर होणाऱ्या या शिक्षण परिषदेत शिक्षक, प्राध्यापक व शिक्षण क्षेत्रात रुची असणाऱ्या सर्वांना सहभाग घेता येणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.के.बी. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड व परिषदेचे निमंत्रक कार्यकारी संचालक गिरीश कुळकर्णी उपस्थित होते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कांताई सभागृहात होणाऱ्या या परिषदेचे बीजभाषण ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रकाश पाठक करणार असून समारोप अहमदाबाद येथील शिक्षण अभ्यासक इंदुमती काटदरे करणार आहेत. पुणे येथील ग्राममंगलच्या संचालिका अश्विनी गोडसे, नागपूर येथील ज्ञान फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रयोगशील संशोधक अजिंक्य कोत्तावार यांची सत्रे होणार आहे. तसेच मुक्तचिंतनाचे एक स्वतंत्र सत्र असणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांचेसह अनेक मान्यवर परिषदेस उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

निबंध स्पर्धा
शिक्षण : का ? व कशासाठी ?” विषयावर राज्यस्तरीय शोध निबंध स्पर्धा होणार आहे. या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने शिक्षण अभ्यासकांना आपले विचार निबंध स्वरुपात सादर करण्याची संधी मिळणार आहे. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन व खुल्या गटातून निबंध
मागविण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास परिषदेत आपला निबंध सादर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. निवडक निबंध व मान्यवरांचे या विषयावरील लेख असलेली एक संदर्भ मुल्य असलेली अभ्यास पुस्तिका परिषदेत प्रकाशित करण्यात येणार असून सहभागी प्रत्येकास विनामुल्य देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड यांनी दिली.

परिषदेची माहिती व आवाहन
उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील शिक्षण अभ्यासकांनी दि. ५ डिसेंबरपूर्वी आपले निबंध पाठवून जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा व आपले विचार मांडावे असे आवाहनही त्यांनी केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी पालक समितीसह मार्गदर्शक व व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गिरीश कुळकर्णी यांनी दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क

संस्थेने यापूर्वी “अध्ययन अक्षमता समजून घेतांना…” व  “आनंददायी शिक्षण” या विषयावर परिषदांचे यशस्वी आयोजन केले आहे. यावर्षीचा विषय शिक्षणाच्या उद्देशपूर्तीचा असल्याने त्याचे स्वरुप मोठे ठेवण्यात आले आहे. उदघाटन व समारोप सत्रास शहरातील नागरिकांना सहभागी करुन घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परिषदेच्या अधिक माहितीसाठी सुजाता बोरकर (९८२३६५४८११) किंवा प्रदीप पवार (८८०५५११५९४) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version