Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रक्तपेढ्यांच्या मनमानीला बसणार चाप

मुंबई । राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. 

राज्यामध्ये काही रक्तपेढ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गैरप्रकार वारंवार होत असल्याच्या तक्रारी विविध निवेदनाद्वारे प्राप्त होत आहेत. यामध्ये थॅलेसिमिया रुग्णांना रक्त न देणे, त्यांचेकडून प्रक्रिया शुल्क घेणे, संकेतस्थळावर दररोजचा साठा न दर्शविणे, तसेच प्लाझ्मा रक्त पिशवीसाठी विहित रकमेपेक्षा अवाजवी रक्कम आकारणे अशा आशयाच्या तक्रारी/निवेदने प्राप्त होत आहेत.

राज्यात अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय/राज्य संक्रमण परिषद/शासन यांचेकडून रक्त व प्लाझ्मा तसेच प्रक्रियेसाठी विहित केलेल्या दरापेक्षा अवाजवी रक्कम आकारणाऱ्या खासगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण संचालक यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे, अशी माहिती प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. यासंदर्भात शासन निर्णयदेखील जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद/राज्य रक्त संक्रमण परिषद/शासन यांनी विहित केलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जादा प्रक्रिया शुल्क आकारल्यास जादा आकारलेल्या प्रक्रिया शुल्काच्या पाचपट दंड केला जाईल. यापैकी जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येणार असून उर्वरित रक्कम राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

थॅलेसिमिया/हिमोफिलिया/सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारी रुग्णांकडे मोफत रक्त मिळण्याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेने जारी केलेले ओळखपत्र असतानादेखील अशा रुग्णांना प्रक्रिया शुल्क आकारल्यास प्रक्रिया शुल्काच्या तीनपट दंड केला जाईल. यापैकी प्रक्रिया शुल्क संबंधित रुग्णास परत करण्यात येईल व उर्वरित रक्कम राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

सूचना फलकावर/संकेतस्थळावर पुरविलेल्या माहितीप्रमाणे रक्त उपलब्ध असताना देखील थॅलेसिमिया/हिमोफिलिया/सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारी रुग्णांना कोणतेही सबळ कारण नसताना रक्त वितरण करण्यास नकार दिल्यास रुग्णास द्यावे लागलेले प्रक्रिया शुल्क अधिक 1000/- रुपये दंड आकारला जाईल. प्रक्रिया शुल्क रुग्णास परत करण्यात येईल.

ई रक्तकोष व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तसाठा व अनुषंगिक माहिती न भरल्यास प्रतिदिन 1000 रुपये याप्रमाणे दंड आकारला जाईल. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तपेढीकडून जी माहिती भरणे अनिवार्य आहे, अशी माहिती न भरल्यास अथवा भरलेली माहिती अद्ययावत नसल्यास त्यासाठी विहित कालावधी संपल्यानंतरच्या कालावधीसाठी 500 रुपये प्रतिदिन दंड आकारला जाणार आहे.

रक्तपेढीकडून वारंवार मार्गदर्शक तत्वे/ सूचनांचे उल्लंघन केले गेल्यास, अशा रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला कळविण्यात येईल व अशा रक्तपेढ्यांचा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून रद्द करण्यात येईल.

 

Exit mobile version