Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चित्रा चौकातील कृषी केंद्र फोडले; चार चोरटे सीसीटीव्हीत कैद (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील चित्रा चौकातील चौरसिया कृषी केंद्र अज्ञात चार चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने फोडून गल्ल्यातील १७ ते १८ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याचे आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चारही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

याबाबत माहिती अशी की, विजयकुमार रमेश चौरसिया (५०) रा. तहसील कचेरीसमोर बळीराम पेठ यांचे शहरातील चित्राचौकात चौरसिया कृषी केंद्र नावाचे दुकान आहे. याठिकाणी कृषी किटकनाशके आदींची विक्री केली जाते. दुकानाला तीन शटर आहेत. दरम्यान आज सकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर चार चोरटे दुकानासमोर आले. काही वेळ दुकानाच्या पायरीजवळ बसले. आजूबाजू टेहाळणी केली. त्यानंतर चार जणांपैकी दोघांनी कटर आणि टॉमीच्या मदतीने दुकानाचे मधले शटर उचकावून दुकानातील गल्ल्या स्क्रृ ड्रायव्हरने उघडून आत ठेवलेले अंदाजे १७ ते १८ हजार रूपयांची रोकड लंपास केली. हा सर्व प्रकार दुकानाच्या दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

दोन दुचाकीवर आल्यानंतर दुकानाच्या पायऱ्यांसमोर एक ६० वर्षीय वृध्द झोपलेले होते. वृध्दाने त्यांना विचारणा केली असता. चोरट्यांनी त्याला दम देवून हाकलून लावले. ६० वर्षीय वृध्द पुढे जावून कृषी केंद्राचे दुकान मालक चौरसिया याना फोन लावून चोरी होत असल्याची माहिती दिली. विजय चौरसिया तत्काळ दुकानाजवळ आले. दुकान मालक आल्याचे पाहून चारही भामटे दुकानावर कटर, टॉमी आणि लाल रंगाची बॅग घटनास्थळी सोडून पसार झाले. चोरी झाल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी पाहणी केली.

दरम्यान, चौरसिया कृषी केंद्रासमोर कृष्णा ईलेक्ट्रीक दुकानही चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानाचे एक कुलूप तोडल्याचे दिसून आले. तसेच सराफ बाजारात काही दुकानाचे कुलूप तोडले असल्याचे बोलले जात होते.

 

Exit mobile version