Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१२ वर्षीय पिडीतेच्या साक्षीवर आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

rigorous imprisonment

जळगाव, प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील विनयभंगाच्या एका खटल्यात आज (दि.२४) १२ वर्षीय बालिकेच्या साक्षीच्या आधारे येथील जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी एकूण नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती.

 

अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील साकरे येथे १४ सप्टेंबर २०१६ रोजी पिडीत १२ वर्षीय अल्पवयीन बालिका घरात एकटी असताना ती शाळेत जाण्यासाठी घराचा दरवाजा बंद करीत होती, तेव्हा आरोपी आरीफ युसुफ खाटीक (वय २५), याने तिच्याकडे बाजारात जाण्यासाठी पिशवी मागितली. ती पिशवी घेण्यासाठी पुन्हा घरात गेली असता आरोपी तिच्या पाठोपाठ घरात गेला आणि त्याने तिचा विनयभंग केला होता. याबाबत धरणगाव तालुका पो.स्टे.ला गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानुसार न्यायालयाने आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम ३५४, ४५२ व पोक्सो कायदयाचे कलम ७, ८ व 9 एम प्रमाणे दोषारोप निश्चित केला होता.

सरकारपक्षातर्फे एकुण नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यात अल्पवयीन फिर्यादी व तपासाधिकारी वगळता सगळे साक्षीदार हे फितूर झाले होते. मात्र १२ वर्षे वयाच्या पिडीतेची साक्ष ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम ३५४ व पोक्सो कायदयाचे कलमाप्रमाणे दोषी घरुन पाच वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची तसेच भा.दं.वि. कलम ४५२ नुसार दोन वर्षे सश्रम कारावासाची व रुपये ५००/- दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. तसेच आरोपीतर्फे अॅड.आर.जे. पाटील व अॅड. महाजन यांनी काम पाहिले.

Exit mobile version