Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्यापासून पुणे येथे तीन दिवशीय १२ वी ‘भारतीय छात्र संसद’चे आयोजन

जळगाव –  लाईव्ह ट्रेंड्स  न्यूज प्रतिनिधी | भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १२व्या भारतीय छात्र संसदेचे स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजन केले आहे.

 

तीन दिवसीय १२व्या भारतीय छात्र संसदेचे दि.१५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजन करण्यात आले  आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे बारावे वर्ष आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे. बाराव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन गुरुवार, दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११  वाजता होईल व समारोप शनिवार, दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३  वाजता होणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या छात्र संसदेत  कायदा आणि न्याय राज्यमंत्री एस.पी. सिंह बघेल, जे.के. उद्योग समूहाचे सीईओ आणि पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी,  इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कैलासवादिवू सिवन,  सीबीआयचे माजी संचालक, डी. आर. कार्तिकेयन, यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय व उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर श्रोत्यांना संबोधित करणार आहेत.

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, . तुषार गांधी, प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, जस्टिस एन. संतोष हेगडे, लोबसांग सांग्ये, मार्क टूली, डॉ. विजय भटकर हे या छात्रसंसदेचे मार्गदर्शक आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संस्थापक आहेत.

छात्र संसदेच्या उद्घाटन व समारोप समारंभाखेरीज या छात्र संसदेमध्ये ६ सत्रे आयोजित केली गेली आहेत. याशिवाय विशेष अशा दोन ‘नेटवर्किंग’ सत्रांचेही आयोजन केले गेले आहे.  अशी माहिती भारतीय छात्र संसदेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक विराज कावडीया यांनी दिली. सविस्तर माहितीसाठी www.bharatiyachhatrasansad.org या संकेतस्थळांना भेट द्यावी असे त्यांनी आवाहन केले आहे.

 

Exit mobile version