Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘ती’ मागणी काश्मीरला बंधनातून मुक्त करण्याची – खा.राऊत

sanjay raut

मुंबई, वृत्तसंस्था | दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर करण्यात आलेल्या आंदोलनात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे पोस्टर झळकावण्यात आले. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे पोस्टर काश्मीरला काही बंधनांमधून मुक्त करा, या मागणीसाठी होते असा दावा केला.

 

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “गेट वे ऑफ इंडियावर झालेल्या आंदोलनात स्वतंत्र काश्मीरचे पोस्टर झळकावण्यात आले. मी पेपरमध्ये वाचले त्यानुसार इंटरनेट, मोबाइल आणि इतर गोष्टींवर लावण्यात आलेली बंदी उठवावी अशी मागणी त्यांनी केली आहे”. पुढे बोलताना त्यांनी जर भारतात कोणी काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्याची मागणी केली तर सहन केली जाणार नाही असेही म्हटले आहे.

अंधारात चोर, दरोडेखोर जातात
जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करताना संजय राऊत यांनी रात्रीच्या अंधारात चोर, दहशतवादी आणि दरोडेखोर जातात अशा शब्दांत टीका केली. तसेच गेट वे ऑफ इंडिया येथून विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलेले नसून त्यांची आंदोलनाची जागा फक्त बदलली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version