Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाकरे सरकारचा बदल्यांचा धंदा; वर्षभर कोरोना संकटात बदल्या टाळण्याचा फडणवीसांचा सल्ला

नागपूर वृत्तसंस्था । कोरोनाच्या संकटाला प्राधान्य देण्याऐवजी ठाकरे सरकारने राज्यात बदल्यांचा धंदा सुरू केला आहे, अशी टीका करतानाच एक वर्ष बदल्या नाही केल्या तर काय फरक पडतो?, असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पूर्व विदर्भात पूराने थैमान घातलं आहे. पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज विदर्भात आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. मात्र, ते करण्याऐवजी राज्यातील मंत्री आणि अधिकारी कुणाला कुठे आणि कशी पोस्टिंग मिळेल यात गुंग झाले आहेत. , अशी टीका फडणवीस यांनी केली.

राज्यात १८ ते २० लाख कर्मचारी आहेत. सध्याच्या काळात १५ टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेणं हेच चुकीचं आहे, बदली केल्यावर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याला भत्ता द्यावा लागतो. त्यासाठी सुमारे ५०० कोटींचा खर्च येतो. राज्यात आर्थिक संकट असताना बदल्यांचा खर्च वाढवण्याची काय गरज होती?, असा सवालही त्यांनी केला.

Exit mobile version