मुंबई-वृत्तसेवा | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी ठाकरे बंधूंनी संयुक्तपणे ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा जाहीर केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसेच्या या एकत्रित भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी पक्ष आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीत लोकशाहीची गळचेपी होत असून, झुंडशाहीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांची मतं रोखली जात असल्याचे सांगत, बिनविरोध निवड ही लोकशाहीचा अपमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षातील उमेदवारांवर दबाव आणणे हे त्या पदाच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही. विधानसभा अध्यक्षांचा अधिकार सभागृहापुरताच असून, बाहेर ते एका आमदाराच्या भूमिकेत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे संबंधित प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
विकासकामांच्या मुद्द्यावरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर उपहासात्मक टीका केली. गेल्या काही दशकांत मुंबईत कोस्टल रोड, मध्य वैतरणा धरण यांसारखी महत्त्वाची कामे झाली असून, कोरोनासारख्या संकटातही महापालिकेने जबाबदारी पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या कामांचे श्रेय घेण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या कामगिरीचा हिशेब द्यावा, असा टोला त्यांनी लगावला.
या पत्रकार परिषदेला आणखी एक विशेष राजकीय अर्थ होता. तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना भवनात प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी खासदार संजय राऊत स्वतः प्रवेशद्वारावर उभे राहिले होते. या दृश्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
वचननामा प्रसिद्ध होण्यापूर्वी दिवसभर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सखोल चर्चा सुरू होती. सकाळपासून विविध बैठकांनंतर पत्रकार परिषदेसाठी मुद्दे निश्चित करण्यात आले. या बैठकीला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अरविंद सावंत, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते.
आता हा संयुक्त वचननामा मुंबईकरांच्या अपेक्षांशी कितपत जुळतो आणि त्याचा मतदारांवर काय परिणाम होतो, हे येत्या निवडणूक प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.



