Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१० रुपयात मिळणाऱ्या शिवभोजनाला अटी-शर्ती लागू

shivbhojan thali

मुंबई, वृत्तसंस्था | १० रुपयात थाळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच या थाळीमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात आणि एक वाटी वरण देण्यात येणार आहे.

 

दरम्यान, १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ १८ हजार थाळ्या मिळणार आहेत. तर मुंबई आणि मुंबई उपनगराला मिळून १९५० थाळ्या मिळणार आहेत. तसेच ही थाळी खाण्यासाठी काही अटी शर्तीचे पालनही करावे लागणार आहे.

या आहेत अटी-शर्ती ?
हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असणार असून भोजनालये केवळ दुपारी १२.०० ते २.०० या कालावधीतच कार्यरत राहणार आहेत. सदर भोजनालयात या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची असेल. यासाठी भोजनालय चालवण्यासाठी सदर मालकाकडे स्वत:ची पर्याप्त जागा असावी.

सदर भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास आणि भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल. भोजनालयात एकावेळी किमान २५ व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल. एका भोजनालयात किमान ७५ आणि कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध होईल.

यासंदर्भात राज्य शासनाने एक जीआर काढला आहे. सध्या राज्यभरात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे. तसेच शहरी भागांमध्ये प्रतिथाळी ५० रूपये तर ग्रामीण भागांमध्ये प्रतिथाळी ३५ रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरी भागांमध्ये दोन चपात्यांसाठी १० रूपये, एक वाटी भाजीसाठी २० रूपये, एक वाटी वरणासाठी १० रूपये आणि एक मूद भातासाठी १० रूपये असे एकूण ५० रूपये ठरवण्यात आले आहेत. परंतु ग्रामीण भागात पुरवण्यात येणाऱ्या थाळीबद्दल मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

Exit mobile version