संत मुक्ताबाई पालखीसह दहा पालख्यांना वारीची परवानगी !

मुंबई प्रतिनिधी । आषाढी वारीसाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांना बसमधून वारीची परवानगी देण्यात आली असून यात जिल्ह्यातील संत मुक्ताबाई वारीचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याबाबतची घोषणा केली.

आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमिवर यंदा तरी वारींना परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यानुसार आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना बसमधून जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं पवार म्हणाले.

राज्य शासनाने परवानगी दिलेल्या दहा मानाच्या पालख्या पुढील प्रमाणे आहेत.-संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर );) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी ); संत सोपान काका महाराज ( सासवड ); संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर ); संत तुकाराम महाराज ( देहू ); संत नामदेव महाराज ( पंढरपूर ); संत एकनाथ महाराज ( पैठण ); रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती ); संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर ); संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड ).

या दहाही मानांच्या पालख्यांना वारीला जाण्यासाठी 20 बसेस दिल्या जाणार आहेत. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक आहे. तर देहू-आळंदी पालखीबरोबर 100 जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली. या सर्व पालख्यांना कोरोनाचे नियम पालन करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. दरम्यान, भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील.

Protected Content