Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४६ अंशावर

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यासह राज्यात मे हिट तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. राज्यात सर्वच ठिकाणी उष्णतेची तिसरी लाट आहे. सोमवारी आणि मंगळवारी दिवसभरात कमाल ४५.५ तर किमान २८ अंश तापमान असून सर्वात जास्त वरणगाव येथे ४६ अंश तापमान नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मे हिट अर्थात वैशाख महिन्यातील तप्त उन्हाचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके तर दुपारच्या वेळी तीव्र झळा जाणवत आहेत. दुपारी बारा एक वाजेपासून ते चार पाच वाजेपर्यत रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे बऱ्याच ठिकाणी आगी लागण्याच्या प्रकारात देखील दिसून येत आहेत. जिल्ह्यात दोन तीन दिवसापासून सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत असून त्यामुळे देखील दमटपणा वाढलेला अनुभवास येत आहे.

सर्वात जास्त वरणगाव येथे ४६ अंश तापमान  
जिल्ह्यातील प्रमुख शहरापैकी वरणगाव येथे ४६ तर जळगाव, भुसावळ ४५.५, अमळनेर, धरणगाव, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल या ठिकाणी ४५ अंश, पाचोरा, एरंडोल ४४, भडगाव ४३, तर चाळीसगाव ४० अंश अशी तापमान नोंद झाली असल्याचे वेलनेस वेदर फौंडेशनचे हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी म्हटले आहे.

प्रकल्प पाणीपातळीत देखील घट
जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रकल्पातील पाणीसाठ्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळीत घट होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील वाघुर प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प पाणीपातळी सरासरी ५० टक्क्यांच्या जवळपास असून ४ गावांसाठी ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

Exit mobile version