Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

  शिक्षकांनी स्वयंप्रेरित आणि स्वयंप्रकाशित व्हावे !

 

जळगाव, प्रतिनिधी । शिक्षण ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, आपण शिकतो म्हणून जगतो आणि जगतो म्हणून शिकतो. अध्यापन हा शिक्षकाचा जीवन धर्म आहे, त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने स्वयंप्रेरित आणि स्वयंप्रकाशित होण्यासाठी आवश्यक क्षमता संपादित केल्या पाहिजेत. औपचारिक शिक्षणात आधी अध्यापन होते आणि नंतर परीक्षा होते. परंतु, जीवनामध्ये आधी परीक्षा आणि नंतर अनुभवजन्य शिक्षण मिळते असे महत्वपूर्ण विचार महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. सुलेखा जोशी, पुणे यांनी आपल्या या मनोगतात व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी त्यांनी पुणे येथून विद्यार्थी शिक्षकांची ऑनलाईन सुसंवाद साधला.

केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात २२ सप्टेंबर रोजी बीएड छात्र अध्यापकासाठी शिक्षक दिनानिमित्त ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.पी. पी. माहुलीकर यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन  महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अशोक राणे यांनी केले. या कार्यक्रमात आपल्या विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता प्राध्यापक साहेबराव भुकन यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यातील परस्पर संबंध अधिक महत्त्वाचा आहे, त्यांनी आपल्या मनोगतात आचार्य विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील ,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी शिक्षण प्रक्रियेबद्दल मांडलेले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी बीएड छात्र विद्यार्थिनी मोनिका सोळंके यांनी ईशस्तवन व स्वागतगीत  सादर केले. या कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक डॉ. रंजना सोनवणे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी तेजस्विनी वाणी, शुभांगी सोनवणे, शबनम मस्तान, एशना जैन , प्रज्ञा पवार, दिपाली गायकवाड, जितेंद्र गायकवाड यांनी शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

आजच्या काळात शिक्षकाची भूमिका मल्टीफॅसिलिटीटेर अशी आहे, त्यासाठी शिक्षकांनी माहिती तंत्र विज्ञान आणि संगणकाचा प्रभावी वापर, नवनवीन संशोधन, अध्यापनाची प्रगत कौशल्ये स्वतः विकसित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अशोक राणे यांनी केले. या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, विभागप्रमुख प्रा.निलेश जोशी व सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version