Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वतःतील क्षमता ओळखत शिक्षकांनी लिहितं-वाचतं व्हावं!- डॉ.गौरी राणे

जळगाव प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या मनोविश्वात जी उलथापालथ सुरु असते ती जाणून घेत शिक्षकांनी त्यांच्याशी संवाद साधायला हवा, त्यांच्या पातळीवर जात बोलायला हवं आणि स्वतःतील क्षमता ओळखत शिक्षकांनी स्वतः लिहितं-वाचतं होतंं संदर्भग्रंथाचं लेखन करावं, असं प्रतिपादन बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.गौरी राणे यांनी केले.

के.सी.ई.सोसायटी आणि लेवा एज्युकेशनल युनियनचे शालेय समन्वयक तसेच लेखक चंद्रकांत भंडारी यांनी लिहिलेल्या ‘देव माणसं अन् गुणी लेकरं’ या प्रशांत पब्लिकेशन्सचे प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी बोलतांना डॉ. गौरी राणे पुढे म्हणाल्या, “प्रसिद्धी पासून नेहमीच दूर राहणार्‍या आणि ग्रंथांवर मनापासून प्रेम करणार्‍या भंडारींनी नेहमीच प्रयोगशील राहत आपले सारं लिखाण केलं आहे. विविध विषयांवर सहज साध्या भाषेत लिहित मराठी साहित्यात आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे.

संस्थेच्या धांडे सभागृहात झालेल्या या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी नंदिनीबाईच्या मुख्याध्यापिका सी.एस.पाटील यांनी पुस्तकाचा थोडक्यात परिचय करुन देत विविध विषयांवर लेखन करणार्‍या भंडारींच्या पुस्तकाचे स्वागत केले. कार्यक्रमाला खडके प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अंजना सुरवाडे, प्रशांत पब्लिकेशनचे रंगराव पाटील, प्रदीप पाटील तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक चंद्रकांत भंडारी यांनी केले. तसेच त्यांनी आभारही मानले.

Exit mobile version