Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नेपाळ आंतरराष्ट्रीय परिषदेत पहूरच्या शिक्षकांचा डंका !

पहूर, ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोरोना काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित सुरू राहावे या ध्येयाने प्रेरित होऊन शंकर भामेरे यांनी पारावरची शाळा सुरु केली. या संदर्भात ४ नोव्हेंबर २०२० रोजी ‘लाईव्ह ट्रेन्डस न्युज’ने व्हीडीओ चित्रीकरणासह वृत्त प्रदर्शित केले होते. या वृत्ताची नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू शहरातील त्रिभुवन विद्यापिठाने घेतली आहे.

नेपाळची राजधानी काठमांडू शहरातील त्रिभुवन विद्यापीठात आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय ‘इंग्लिश लैंग्वेज टीचर्स अँड अप्लाइड लिंग्विस्टिक ‘ परिषदेमध्ये पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख शंकर रंगनाथ भामेरे यांनी शोधनिबंध सादर केला तर हरीभाऊ भानुदास राऊत यांनी परिषदेत सक्रिय सहभाग नोंदविला .

दि .२८ आणि २९ मे २०२२ दरम्यान काठमांडू येथे झालेल्या या परिषदेत शंकर भामेरे यांनी ‘टीचिंग इंग्लिश ड्यूरिंग पेंडॅमिक सिच्युएशन ‘ या विषयावर शोध निबंध सादर केला .

२०१९ आणि २०२० या शैक्षणिक वर्षात covid-19 च्या प्रादुर्भावामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित सुरू राहावे , या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन शंकर भामेरे यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शासकीय नियमांचे पालन करीत लेले नगर येथील हनुमान मंदिरात कुठलाही मोबदला न घेता शाळा भरविली. १८ महीने ही शाळा सुरू होती. या शाळेतून विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या अध्यापनासह कोरोना निर्मूलनासाठी  सामाजिक जागृतीचे कार्य केले. टप्प्याटप्याने १०० पेक्षा अधिक गरजू विद्यार्थ्यांनी पारावरच्या शाळेचा लाभ घेतला होता.

या संदर्भात ४ नोव्हेंबर २०२० रोजी व्हीडीओ चित्रीकरणासह लाईव्ह ट्रेन्डस न्युजने वृत्त प्रदर्शित केले होते. या वृत्ताची  नेपाळ (काठमांडू)शहरातील त्रिभुवन विद्यापिठात आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय` इंग्लिश लैंग्वेज टीचर्स अँड अप्लाईड लिंग्विस्टिकʼ परिषदेमध्ये पहूर येथील आदर्श शिक्षक श्री शंकर भामेरे यांच्या पारावरच्या शाळेचा गौरव झाला.

काठमांडू येथील त्रिभुवन विद्यापिठात शंकर भामेरे यांनी या पारावरच्या शाळेचा प्रकल्प पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे यशस्वीरित्या सादर केला . हरिभाऊ राऊत यांनी परिषदेत सहभाग नोंदविला. विद्यापीठातर्फे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. गोपाल पांडे, प्रा. भावना मॅम, प्रा.लीना हैद,  प्रा.डॉ.जोसेफ निकोलस, डॉ. लक्ष्मण गुणवली आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. शंकर भामेरे यांनी बसस्थानकावर चहा विकून शिक्षण घेतले असून हरिभाऊ राऊत यांनी दुकानावर शेतात हात मजुरी करत उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांचा संघर्षमय प्रवास तरुणांना प्रेरणा देणारा आहे.

यापूर्वीही शंकर भामेरे यांनी इंडिया – बांगलादेश टेली कोलॅबोरेशन प्रोजेक्ट , इन्डो – कॅनेडियन इंटरनॅशनल कॉन्फरन्स यासह विविध राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांना शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी विकास पाटील, तत्कालीन  गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे,   महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, इंग्लिश टिचर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ,  मुख्याध्यापिका व्ही. व्ही. घोंगडे, हरिभाऊ राऊत आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Exit mobile version