पंतप्रधान व भाजप अध्यक्षांना नियम पालन शिकवा : राऊत

मुंबई प्रतिनिधी | निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना नियम पालन करणे शिकवावे असे नमूद करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज आयोगावर टीका केली आहे.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम  जाहीर केला आहे. यासह प्रचारसभा, कोणत्याही प्रकारच्या रॅलीला बंदी घालण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत तरी समान कायदा असायला हवा. निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांना द्यावेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

या संदर्भात राऊत म्हणाले की, पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती चांगली नाही. निवडणुक आयोगाने निर्बंध घातले आहेत. हे कागदावरती ठीक आहेत. देशाचे पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना कुठलेही नियम नसतात आणि तेच इतरांसाठी असतात. त्यामुळे निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा. निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना द्यावेत, असे संजय राऊत म्हणाले. ते मीडियाशी बोलत होते.

राऊत पुढे म्हणाले की, गोव्यामध्ये महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही मनापासून प्रयत्न केले पण कॉंग्रेसच्या मनामध्ये आहे की, ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात. त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील त्यामुळे ते मागेपुढे करत आहेत. कॉंग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत पण आमच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत पण शिवसेना निवडणुका लढणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

 

Protected Content