Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री राम मंदिराच्या भूमिपुजनाला तापी-पूर्णा संगमाचे पवित्र जल व संत मुक्ताईची माती ! (व्हिडीओ)

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी । अयोध्या येथे ५ ऑगस्ट रोजी होणार्‍या श्री राम मंदिराच्या भूमिपुजनासाठी तापी व पुर्णा संगमाचे पवित्र जल व संत मुक्ताई मंदिर परिसरातील माती वापरण्यात येणार आहे. महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण आले असून त्यांनी आज हे पवित्र जलाचे पूजन केले. ते उद्या अयोध्येला प्रयाण करणार आहेत.

याबाबत वृत्त असे की, अयोध्या येथे भव्य श्री राम मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. याचे भूमिपुजन ५ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात येणार आहे. यासाठी देशभरातील मोजक्या मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आले असून यामध्ये फैजपूर येथील सत्पंथ मंदिराचे गादीपती तथा महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचा समावेश आहे. या मंदिराच्या भूमिपुजनाला देशभरातील तीर्थक्षेत्र व पवित्र नद्यांच्या संगमाचे पाणी तसेच देव स्थानांच्या परिसरातील मातीचा वापर केला जाणार आहे. या अनुषंगाने आज महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी तापी-पुर्णा नदीच्या संगमावर जाऊन पूजन करून येथील पवित्र पाणी आपल्या सोबत घेतले. यानंतर त्यांनी संत मुक्ताई मंदिरात जाऊन या परिसरातील माती आपल्या सोबत घेतली. ते उद्या म्हणजे २ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्या येथे हे पवित्र जल व माती घेऊन प्रयाण करणार आहेत.

आजच्या कार्यक्रमाला खासदार रक्षाताई खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, बेटी बचाओ-बेटी पढाओचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके, हभप रवींद्र महाराज हरणे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, सावद्याच्या माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे, भुसावळचे नगरसेवक परिक्षीत बर्‍हाटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

खालील व्हिडीओत पहा या कार्यक्रमाचा व्हिडीओ.

Exit mobile version