Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासंदर्भात खा.रक्षा खडसेंनी घेतली जलशक्ती मंत्र्याशी भेट

raksh khadse

भुसावळ/ फैजपूर प्रतिनिधी । तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी व पुढील कामे अधिक गतीने सुरू होण्यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यातील खासदार, आमदार, केंद्रीय भूजल मंडळाचे अधिकारी, व सरकारी अधिकारी यांची एकत्रित बैठक या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान सर्वांना सोयीस्कर अशा दिवशी आयोजित करावी यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांनी जलशक्ती मंत्री श्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली.

 

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील तापी नदीवर प्रस्तावित महाकाय पुनर्भरण योजनेसाठी (तापी मेगा रिचार्ज प्रोजेक्‍ट) तापी खोऱ्याचे अद्ययावत तंत्रज्ञानाने हवाई सर्वेक्षण ऑगस्ट 2018 मध्ये वॅपकॉस संस्थेमार्फत करण्यात आले. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातून उगम पावणारी ही नदी महाराष्ट्रातून गुजरात द्वारे समुद्रास मिळते. सातपुडा पर्वतातून बाहेर पडणाऱ्या नदीनाल्यांचे पाणी धारणी ते तळोदा तसेच धारणी व अचलपूर ते इच्छापूर या भागात जमिनीत झिरपते. मात्र, मध्य प्रदेशातील नेपानगर, बऱ्हाणपूर व महाराष्ट्रातील रावेर, यावल व चोपडा तालुके या तापी खोऱ्यातील भागातील भूजलपातळी दरवर्षी 1 मीटरने खाली जात आहे. पाणीपातळी खालावण्याचा हा दर भारतात सर्वाधिक आहे. ही बाब लक्षात घेता या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी 30 जून 2003 ला प्रथम प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. केंद्र सरकारने 2014 मध्ये टास्क फोर्सचे गठण करून महाकाय पुनर्भरणाचा प्रस्ताव सहा महिन्यांत तयार करण्याचे निर्देश दिलेले होते.

या प्रकल्पाच्या पूर्ततेच्या दृष्टीने या प्रकल्प क्षेत्राची हवाई पाहणी 10 जानेवारी 2016 रोजी केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश भाऊ महाजन, खासदार रक्षाताई खडसे यांनी केली होती. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी भूजल पातळी वाढण्यास साहाय्यभूत ठरू शकणारा तापी महाकाय पुनर्भरण (मेगा रिचार्ज) प्रकल्प मार्गी लागण्यासाठी राज्य सरकारतर्फे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा हा खान्देशातील जिल्ह्यांना होणार आहे. हवाई सर्वेक्षण ‘लिडार’ या आधुनिक पद्धतीने हे सर्वेक्षण केले जाणार गेले.

या प्रकल्पाच्या कामासाठी सर्वेक्षण करीत असलेल्या ‘व्हॅपकॉस’ या संस्थेकडून सातपुडा पर्वत रांगा, तापीच्या विस्तारक्षेत्रातील भूगर्भाचा अभ्यास केला गेला. या सर्वेक्षणात भूगर्भातील गूढ आवाज, पोकळी, खडक, मातीचा प्रकार, गरम पाण्याचे झरे, अंतर्गत प्रवाहाची दिशा या बाबींचा शास्त्रोक्त पद्धतीने वेध घेतला गेला. दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. जिओफिजिकल सव्‍‌र्हे, सिव्हिल वर्क आणि अहवाल या तीन टप्प्यांत ‘डीपीआर’चे काम विभागण्यात आले आहे.

केंद्रीय भूजल मंडळाने सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी तापीच्या पावसाळ्यातील पाण्याद्वारे महाकाय पुनर्भरण प्रकल्प राबवण्यात यावा, अशी सूचना केली होती. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील ८० ते ९० नदी-नाल्यांमध्ये जलपुनर्भरण होऊ शकेल. तापी नदीच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. २००४ पासून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून वाहणाऱ्या तापी नदीच्या उजव्या आणि डाव्या तीरावर सातपुडा पर्वतरांगा असून हा भाग जलभूगर्भीय भूभ्रंश आहे. या भूभ्रंशामुळे एक ते चार किलोमीटर रुंदीचा पाणी झिरपण्याची क्षमता असलेला ‘बझाडा झोन’ तयार झालेला आहे. आज पाण्याचा होत असलेला वापर आणि जमिनीत जिरणारे पाणी यातील तफावतीमुळे भूजल पातळी ही खालावत चाललेली आहे. यातून महाकाय पुनर्भरण योजना प्रस्तावित करण्यात आली. तापी नदीचे गुजरातला वाहून जाणारे पाणी मेळघाटातील खारीयाघुटीजवळ अडवून नंतर उजव्या आणि डाव्या कालव्यांच्या माध्यमातून त्याचे जमिनीत पुनर्भरण केले जाणार आहे. यामुळे या भागातील आज ७०० फुटांपर्यंत खाली गेलेली पाणी पातळी उंचावण्यास  मदत होईल, असे सांगण्यात आले आहे.

तापी नदीवरील प्रस्तावित महाकाय पुनर्भरण योजनेत (मेगा रिचार्ज ) तापी नदीतून गुजरातला वाहून जाणाऱ्या ४५.५० टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. त्यामुळे ४ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या योजनेमुळे प्रत्यक्ष सिंचन १ लाख २ हजार हेक्टरमध्ये होणार असून, महाराष्ट्रात २४ हजार हेक्टर तर मध्य प्रदेशात ७८ हजार हेक्टरमध्ये होईल. पुनर्भरणाद्वारे अप्रत्यक्ष लाभ महाराष्ट्राला २ लाख ११ हजार  हेक्टर तर मध्य प्रदेशला ९६ हजार हेक्टर असा एकूण ३ लाचा १० हजार हेक्टरमध्ये अप्रत्यक्ष लाभ होणार आहे, अशा रीतीने महाराष्ट्राला एकूण २ लाख ३७ हजार  हेक्टरमध्ये तर मध्य प्रदेशला १ लाख ७४ हजार हेक्टरमध्ये लाभ होणार आहे.

दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण होणार असून, त्यामुळे महाराष्ट्राला २० टीएमसी तर मध्य प्रदेशला २५.५० टीएमसी असे ४५.५० टीएमसी पाणी तापी नदीतून वापरता येणार आहे. पावसाळ्यात खारीयाघुटी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील तालुक्यात ठिकठिकाणी नदी नाल्यात सोडले जाईल. भूमिगत बंधारे, गॅबीअन बंधारे, पुनर्भरण विहिरी, इंजेक्शन वेल्स व साठवण बंधारे बांधून त्याद्वारे पुनर्भरण करून खोल गेलेली भूगर्भातील पाणी पातळी उंचावणे आणि निमाण होणाऱ्य़ा पाणी साठय़ाद्वारे सिंचन करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

Exit mobile version