Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लाचेची मागणी करणारा तालुका आरोग्य अधिकारी जेरबंद; धुळे पथकाची कारवाई

चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी जागा भाडेतत्वावर सुरू करण्यासाठी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी यांनी ५० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी धुळे लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी तथा तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ देवराम किसन लांडे (वय-५३) असे लाचखोर आरोग्य अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे चाळीसगाव शहरातील रहिवासी आहे, त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी देण्यासाठी जळगाव येथील जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाला अर्ज केला होता. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. देवराम लांडे हे कारभार पाहत होते. त्यानंतर तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेऊन त्यांना नियमित भाडे सुरू करण्याच्या मोबदल्यासाठी डॉ. लांडे यांनी ५० हजाराची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर डॉ. लांडे यांची पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी म्हणून बदली झाली होती. लाचलुचपत विभागाने कारवाईसाठी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, ही कारवाई धुळे विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम, शरद कटके, पोलीस शिपाई संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे यांच्यासह आदींनी केली आहे.

Exit mobile version