Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही; चर्चा न करता निलंबनाची कारवाई – डॉ. उल्हास पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपमध्ये जाण्याबाबत माझा कोणताही विचार नव्हता, माझी कन्या प्रवेश करणार आहे. परंतु काँग्रेसने आपल्याशी कोणतीही चर्चा न करता एकाधिकारशाहीने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे आता आपल्याकडे कोणताही पर्याय नाही. त्यामुळे दोन दिवसांत आपल्यालाही काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, असे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉ. पाटील व त्यांची कन्या डॉ. केतकी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर काँग्रेसने डॉ. पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील व युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र पाटील यांचे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन केले आहे. याप्रकरणी डॉ. उल्हास पाटील यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. देवेंद्र मराठे, डॉ. वर्षा पाटील उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, आज अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. संपूर्ण देश आनंदात आहे, आपणही या आनंदात सहभागी होतो. आपण आनंद साजरा करून दुपारी घरी आल्यानंतर आपल्याला व आपल्या पत्नीला, तसेच देवेंद्र मराठे यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्याबाबतचे व्हॉट्सॲ‌पवर काँग्रेसच्या वरिष्ठांचे पत्र मिळाले.त्यामुळे आपल्याला अत्यंत वाईट वाटले. आपण गेले अनेक वर्षे काँग्रेसमध्ये कार्य करीत आहोत. काँग्रेसच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली, त्यामुळे अनेक खटलेही आमच्यावर दाखल आहेत.

अशा स्थितीत आपल्याला यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठांनी विचारणा करण्याची गरज होती; परंतु प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह जिल्ह्याच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी चर्चा न करता, नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार बाजू मांडण्याची संधी न देता आपल्यावर ही एकतर्फी कारवाई केली आहे. ही चुकीची कारवाई आहे. काँग्रेसने आपल्यावर निलंबनाची कारवाई केल्यामुळे आपण आज कोणत्याही पक्षात नसल्याचे सांगून डॉ. पाटील म्हणाले, आता आपल्यासमोर पर्याय नाही. त्यामुळे दुसऱ्या पक्षात प्रवेशाबाबत आपण कोणताही निर्णय घेतला नव्हता. परंतु आता आपण घेणार आहोत. त्याबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार आहोत. कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्या सध्या कोणत्याही पक्षात नाहीत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत देशासाठी जे कार्य केले आहे, ते आवडले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा स्वतंत्र निर्णय आहे, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षाचे संघटन व प्रशासन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी याबाबतचे पत्र सोमवारी (ता. २२) जारी केले. या पत्रात कोणतेही कारण न देता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. डॉ. पाटील ३० वर्षांपासून काँगेसमध्ये आहेत, काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

त्यांनी नुकतीच काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली होती, तर त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनीसुद्धा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यातच सोमवारी डॉ. पाटील यांनी कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह बुधवारी (ता. २५) भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केली. याबाबतचे वृत्त प्रसारित होताच राजकीय क्षेत्रात विशेषत: काँग्रेसमध्ये जोरदार घडामोडी घडल्या. दरम्यान, मुंबईतील नेते मिलिंद देवरा यांच्यानंतर आता काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे खंदे समर्थक डॉ. उल्हास पाटील यांनी पक्ष सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला जळगाव जिल्ह्यासह खानदेशात हादरा बसला आहे.

Exit mobile version