१६ लाखांच्या बिस्कीटाने भरलेला कंटेनर चोरणाऱ्या संशयितांना अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । १६ लाख रूपये किंमतीच्या बिस्कीटाने भरलेला उभा कंटेनर चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना मास्टर कॉलनीतून ताब्यात घेतले आहे. त्यांनी चोरलेला कंटेनर पोलीसांनी हस्तगत केला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाड येथील रहिवासी राजेंद्र बाबुराव कचरे यांचा ट्रान्सपार्टचा व्यवसाय आहे. त्यांचा मालकीचा टाटा कंटेनर क्रमांक (एमएच २० इजी ४२८७) ट्रक मध्ये १६ लाख रूपये किंमतीचा बिस्कीटांचा माल भरण्यात आलेला होता. शनिवारी १६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद शहरातून चोरून नेला होता. याप्रकरणी संदर्भात औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा पोलीस ठाण्यात ट्रक मालक राजेंद्र कचरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी यांनी कंटेनर जळगाव शहरात असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिखरे यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात शोध पथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस हवालदार सचिन मुंढे, पोलीस नाईक गणेश शिरसाळे, योगेश बारी यांनी कंटेनर क्रमांक (एमएच २० इजी ४२८७) याला मुद्देमालासह हस्तगत करून संशयित आरोपी यासीन खान मासूम खान मुलतानी आणि जाकीर अमिन मुलतानी दोन्ही रा. मास्टर कॉलनी, जळगाव यांना ताब्यात घेतले. दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी २१ जुलै रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content