Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीत दहशतवादी घुसल्याचा संशय ; ॲलर्ट जारी

delhi police

नवी दिल्ली प्रतिनिधी । राजधानी दिल्लीत ३ ते ४ आत्मघातकी दहशतवादी शिरल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. ही माहिती मिळताच बुधवारी रात्रीपासून दिल्लीत रेड ॲलर्ट घोषित करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुप्तचर यंत्रणांना ही माहिती मिळाल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी बुधवारी रात्री दिल्लीतील ९ ठिकाणांवर छापे मारले. या दरम्यान दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सीलमपूर आणि उत्तर-पूर्व दिल्लीतील आणखी दोन ठिकाणांवरदेखील छापे टाकण्यात आले आहेत. यात जामिया नगर आणि पहाडगंज जवळील मध्य दिल्लीतील २ जागांचा समावेश असून दिल्ली पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीत रेड ॲलर्ट घोषित झाल्यानंतर दिल्ली पोलीस सतर्क असून ते प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करत आहेत. दिल्लीत शिरलेले हे आत्मघातकी दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी आहेत. हे दहशतवादी गेल्याच आठवड्यात दिल्ली शहरात शिरले आहेत. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर बिथरलेल्या दहशतवाद्यांनी दिल्लीत मोठा हल्ला करण्याची योजना आखली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत शिरलेल्या दहशतवाद्यांपैकी कमीत कमी दोन दहशतवादी हे पाकिस्तानी आहेत.

Exit mobile version