Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पालघरच्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट; पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा

FISHER

 

पालघर (वृत्तसंस्था) पालघरच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसली असून सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. श्रीलंकेतील साखळी बॉम्ब हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर सतर्कता बाळगण्यात येत आहे. ही बोट श्रीलंकेच्या समुद्रातून पालघरच्या समुद्रात आल्याचे समजते. या बोटीवर अन्न धान्य आणि अन्य वस्तूंचा साठा आहे. यामुळे तटरक्षक दलाने पालघरच्या मच्छीमारांशी सकाळीच बैठक घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, पालघर किनाऱ्यावरील पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

 

श्रीलंकेत घडलेल्या बॉम्बस्फोटात जवळपास 350 नागरिकांचा बळी गेला होता. या स्फोटाची जबाबदारी ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. केरळच्या किनारपट्टीवर या दहशतवादी संघटनेच्या हालाचाली वाढत आहेत. शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणांनी लक्षद्वीपमार्गे केरळ किनारपट्टीवर एक बोट पाहिली. या बोटीत 15 दहशतवादी असल्याचा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. तटरक्षक दलाच्या प्रवक्त्यानुसार मच्छीमारांना यासंबंधीची माहिती देण्यात आली असून त्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच काही हालचाली दिसल्यास तटरक्षक दल किंवा पोलिसांना लागलीच कळविण्यास सांगितले आहे. मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी भर समुद्रातच भारतीय बोटीवर ताबा मिळवत हल्ला केला होता. यामुळे मच्छीमारांना सतर्क करण्यात आल्याचे समजते. संरक्षण यंत्रणेने दिलेल्या इशाऱ्यानंतर पालघर पोलिस सतर्क झाले असून किनारपट्टीवरील संशयास्पद हालचाली लक्ष ठेवून आहेत.

Exit mobile version