Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेला पाठींबा देण्यास सुशीलकुमार शिंदे यांचा विरोध

sushilkumar shinde

मुंबई, वृत्तसंस्था | भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला असतानाच, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राजकीय वैर बाजूला सारून शिवसेनेला पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र तसे करण्याला विरोध दर्शवला आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल मिळाला आहे. मात्र, भाजपला सरकार स्थापन करण्यात अपयश आले तर त्यानंतरचा दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेची संधी असेल. त्यांनी सरकार स्थापण्यासाठी पुढाकार घेतला व पाठिंब्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव दिला तर निश्चितच त्याचा विचार करण्यात येईल. हा प्रस्ताव हायकमांडपुढे मांडून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, राज्यातील जनतेने दिलेला कौल मान्य करून विरोधी पक्षात बसावे, असे शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारधारेचे आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, काँग्रेसचे राज्यातील प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. शिवसेनेसोबत सरकार स्थापण्याचा प्रश्नच येत नाही. जनतेने काँग्रेसला जो कौल दिला आहे, त्यानुसार काँग्रेस विरोधी बाकावरच बसणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची काल, गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेसचे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लक्ष आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे, त्यांनी सरकार स्थापन करावे. जनतेने काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, असेही त्यांनी सांगितले होते.

Exit mobile version