Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव ते जालना रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव ते जालना या मार्गावर नवीन रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठीच्या सर्वेक्षणास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्याने या कामाला आता गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव ते जालना या दोन शहरांना जोडणार्‍या रेल्वे मार्गाची मागणी कधीपासून करण्यात येत असतांना याबाबत आजवर कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. या पार्श्‍वभूमिवर मंगळवारी जालना-जळगाव या १७४ किमी नवीन रेल्वेमार्गाच्या अंतिम भूखंड सर्वेक्षणास मंगळवारी रेल्वे बोर्डाचे प्रकल्प संचालक पंकजकुमार यांनी मंजुरी दिली. या कामासाठी ४ कोटी ३५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या मतदारसंघासाठी हा मार्ग मंजूर करून आणला आहे. हा नवीन रेल्वेमार्ग राजूर, भोकरदन, सिल्लोड या मार्गाने जळगाव व जालना या दोन शहरांना जोडणार असून सर्वेेक्षण हा याच्या कार्यान्वयनातील पहिला टप्पा आहे. प्रत्यक्षात रेल्वे मार्गासाठी बराच वेळ लागणार असला तरी यासाठी किमान हालचाली तरी सुरू झाल्याची बाब महत्वपूर्ण मानली जात आहे.

Exit mobile version