Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात जिम उघडण्यासाठी सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई वृत्तसंस्था । राज्यात अनलॉक सुरू झाल्यानंतर राज्यांतर्गत एसटी बस सेवाही आजपासून सुरू होत आहे. मात्र, व्यायामशाळा अजूनही बंद आहेत. जिम चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं जिम उघडण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर लॉकडाऊन झुगारून जिम उघडण्याचे आवाहन जिम चालकांना केले होते. काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना याच संदर्भात पत्र लिहिलं होतं. दारूची दुकानं सुरू होतात, पण जिम बंद आहेत हे दुर्दैव आहे, असे फडणवीस यांनी म्हटलय.

सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला असून ट्वीटरच्या माध्यमातून जिम चालकांची, व्यायामपटूंची आणि प्रशिक्षकांची व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. मुंबईतील एका जिम चालकानं लिहिलेलं पत्रही त्यांनी ट्वीट केलं आहे.

‘जिम, हेल्थ क्लब, व्यायामशाळा यावर उपजिविका असलेल्या सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. लॉकडाऊन असले तरी जागामालक भाड्यासाठी, बँकवाले हप्त्यांसाठी, शाळाचालक मुलांच्या फीसाठी तगादा लावत आहेत.

पाणी बिल, वीज बिल भरावेच लागत आहे. आतापर्यंत जेवढी बचत होती तीही संपली आहे. त्यामुळं जिमचे चालक, मालक, प्रशिक्षकांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना जिम उघडण्यास मान्यता देण्याची विनंती केली आहे.

Exit mobile version