Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

pmc bank 300x162

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानं लाखो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हवालदिल झालेल्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पीएमसी बँकेवर निर्बंध आणण्यात आले असून पैसे काढण्यावर मर्यादा आणण्यात आली आहे. यामुळे अनेक खातेधारक चिंताग्रस्त असून धक्क्याने दोन खातेदारांचा मृत्यूदेखील झाला आहे. काही खातेदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका करत पैसे काढण्यावर मर्यादा आणणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने आधीच चिंताग्रस्त असणाऱ्या खातेदारांच्या चिंतेत भर टाकली असून दिलासा देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान पीएमसी बँकेच्या ठेवीदारांचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन बँकेच्या प्रशासकाने बुधवारी रिझव्‍‌र्ह बँकेला दिलं आहे. बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया व त्यांच्या दोन सहयोगी सदस्यांनी बुधवारी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास तसेच डेप्युटी गव्हर्नर, मध्यवर्ती बँकेच काही वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली. बँकेचे ठेवीदार, भागीदार यांच्या संरक्षणार्थ सर्व त्या उपाययोजना केल्या जातील, असे प्रशासकाने म्हटलं आहे. बँकेचा ताळेबंद नव्याने तयार करण्यात येऊन त्यातून बँकेचे खरे रूप समोर येईल, असा दावाही करण्यात आला आहे. आर्थिक चिंतेने बँकेच्या काही ठेवीदारांचा मृत्यू तसेच आत्महत्येच्या घटना घडत असताना बँकेच्या खातेदारांनी बुधवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुंबई तसेच दिल्लीच्या कार्यालयासमोर संतप्त निदर्शने केली.

Exit mobile version