Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुप्रीमची पाईपलाईन वाघूरला जोडणीस सुरुवात !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनीवासियांना अमृत योजनेंतर्गत नियमीत पाणीपुरवठा करण्यासाठीचे काम अंतीम टप्प्यात आले असून वाघूरच्या मुख्य जलवाहिनीला सुप्रीम कॉलनीची नवीन जलवाहिनी जोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सोमवारी महापौर भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

सुप्रीम कॉलनीत अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाची सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते.

विद्युत पंप बसविण्यास सुरुवात

सुप्रीम कॉलनीत उभारण्यात आलेल्या पंप हाऊसमध्ये दोन उच्च क्षमतेचे विद्युत पंप दाखल झाले आहेत. पंप बसविण्यासाठी आवश्यक असलेले गर्डर टाकण्याचे काम सुरू असून त्यानंतर लागलीच पंप बसविण्यात येऊन चाचणी घेतली जाणार आहे.

महामार्गजवळून होणार जोडणी

सुप्रीम कॉलनीत अमृत योजनेंतर्गत नव्याने जलवाहिनी टाकण्यात आलेली असून ती नवीन भूमीगत जलकुंभाला जोडण्यात आलेली आहे. वाघूरची मुख्य जलवाहिनी महामार्गाजवळून जाते. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्याठिकाणी मक्तेदाराने माती टाकलेली असल्याने जोडणीच्या कामाला विलंब होणार होता. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाहणी करून महामार्गाच्या मक्तेदाराला उद्या सकाळी १० वाजेपर्यंत सर्व माती बाजूला करण्याच्या सूचना केल्या. सर्व खोदकाम पूर्ण करून मुख्य जलवाहिनील जोडणी केली जाणार आहे.

 

Exit mobile version