राष्ट्रवादी आमदाराच्या समर्थकांची आपल्याच पक्ष कार्यालयावर दगडफेक

सातारा | सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी आपल्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक करून रोष व्यक्त केला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच हल्ला चढवला आहे. शिंदे समर्थकांना पक्ष कार्यालयावर दगडफेक करत राग व्यक्त केला असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. शिंदे यांना २४ तर रांजणे यांना २५ मते मिळाली. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत. स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदेंना हा पराभव स्वीकारावा लागल्याचा आरोप करत शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करून कार्यालयावरच दगडफेक सुरू केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शशिकांत शिंदे आगे बढो, राष्ट्रवादीचा विजय असोच्या घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. पराभव खिलाडी वृत्तीने मान्य करावा लागतो. तो मी मान्य केला आहे. हार-जीत होत असते. पक्षाने प्रयत्न केले. पण एका मताने पराभूत झालो. परत जोमाने कामाला सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी या प्रकाराबद्दल आपल्या समर्थकांच्या वतीने पक्ष नेतृत्वाची माफी मागितली आहे.

Protected Content