Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाह रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल !

मुंबई प्रतिनिधी | माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विदेशातून येणार्‍या मद्यावरील आयात शुल्क घटविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर कडाडून टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ५० टक्क्यांनी कमी केले आहे. आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी, खर्चाच्या ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्यात आली आहे, असे अधिकार्‍याने पीटीआयला सांगितले. आयात केलेल्या विदेशी मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे कारण यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल. मात्र हा निर्णय वादाच्या भोवर्‍यात सापडला असून यावर विरोधकांनी टिकास्त्र सोडले आहे.

या निर्णयावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जनतेच्या आशीर्वादाने लोकशाही मार्गाने सरकार निवडून येतात. त्या सरकारचा प्रत्येक निर्णय शेतकर्‍यांना समर्पित असतो. शोषित समाजाला समर्पित असतो. वंचित समाजाला समर्पित असतो. गोरगरिबांना समर्पित असतो. शेतमजुरांना समर्पित असतो. पण बेइमानीच्या आधारावर हे सरकार स्थापन झालेले आहे. जनतेने निवडून दिलेलं हे सरकार नाही. दारू स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांचा हा निर्णय हर्बल वनस्पतीवाल्यांसाठी आणि क्रुझ पार्टीवाल्यांसाठी समर्पित आहे. सरकार पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करत नाही. दारूचे पण भाव कमी करून बेवड्यांना ऊर्जा देण्याचं काम हे सरकार करत असल्याची टीका मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केली.

Exit mobile version