गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा : अमळनेर पोलिसांचा गौरव !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तीन वेगवेगळ्या पद्धतीने नवख्या गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांमध्ये अचूक आणि योग्य रित्या डिटेक्शन केल्याबद्दल अमळनेर पोलीस स्टेशनच्या चार अधिकार्‍यांसह सतरा कर्मचार्‍यांचा जिल्हा पोलीस अधिक्षकांतर्फे जिल्हा गुन्हे आढावा बैठकीत प्रमाणपत्र व बक्षीस देऊन विशेष गौरव करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपूर्वी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे साबण असलेला ट्रक देशातील सराईत गुन्हेगारांनी लंपास केला होता. आरोपींचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक माहीत नसताना अगदी छोट्या माहितीवरून आरोपी पकडले होते. यानंतर जानवे गावाजवळ पेट्रोलपंपावर पिस्तुल दाखवून लूटमार करणारा नवखा गुन्हेगार राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्याच्यावर झडप घालून पकडण्यात यश आले आणि तालुक्यातील नवखे तरुण सोनसाखळी चोरत असल्याचा शोध लावला व त्यांना अटक केली.

अशा प्रकारे तीन गुन्ह्यांचे उत्तमरीत्या डिटेकशन केले म्हणून जिल्हा गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक विजय शिंदे , पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे ,पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे ,पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू साळुंखे , हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील , पोलीस नाईक मिलिंद भामरे , सूर्यकांत साळुंखे , नाईक रवींद्र पाटील , दीपक माळी ,शरद पाटील , सुनील हटकर ,निलेश मोरे , योगेश महाजन , अमोल पाटील ,श्रीराम पाटील , उज्वल पाटील यांचा प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे व जिल्ह्यातील सर्व अधिकारी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी केले.

Protected Content