Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुध उत्पादकांना पाच रूपये प्रति लिटर अनुदान !

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील दुध उत्पादकांना आता प्रति लिटर पाच रूपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा आज राज्याचे पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली.

राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणार्‍या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली. लक्षणीय बाब म्हणजे ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, यासाठी सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकर्‍यांना  ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफसाठी प्रति लिटर किमान २९ रुपये दूध दर  शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर रोख जमा करणं बंधनकारक असून यानंतरच शेतकर्‍यांना शासनामार्फत ५ रुपये प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.

योजना  १ जानेवारी २०२४ ते दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी लागू राहणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. यासाठी दूध उत्पादक शेतकर्‍यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी  लिंक असणे आवश्यक आहे. याबाबतीत शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती देखील विखे पाटील यांनी आज दिली.

Exit mobile version