Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार करणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या कालावधीत मृत्यूमुखी पडलेल्या अनेकांच्या मृतदेहांवर बरेच नातेवाईक अंत्यसंस्कारही करणे टाळतात; परंतु, या बेवारस प्रेतांवर नेरी नाका येथील स्मशानभूमीत काही विद्यार्थी निस्वार्थ भावनेने अंत्यसंस्कार करीत आहेत. त्या विद्यार्थ्यांचा सत्कार माहेश्‍वरी सभेतर्फे गोशाळेत करण्यात आला.

कोरोनाच्या कालावधीत अनेक रुग्णांच्या मदतीला भीतीपोटी कोणीही येत नाही. तर अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्याकडे कोणी फिरकत नाहीत. त्यामुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्‍न उपस्थित होतो. अशा बेवारस 100 पेक्षा जास्त प्रेतांवर मूळजी जेठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मुकेश पाटील, विकास वाघ, अमोल बावणे, कृष्णा साळवे, मुकेश सावकारे, करण मालकर हे  21 मार्चपासून मोठी जोखीम पत्करुन अंत्यसंस्कार करीत आहेत.  या विद्यार्थ्यांची समाजसेवा लक्षात घेता माहेश्‍वरी सभेतर्फे त्यांचा सत्कार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्याम कोगटा, माहेश्‍वरी सभेचे शहर व तालुकाध्यक्ष योगेश कलंत्री, सचिव विलास काबरा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक मान्यवरांनी केले. सामाजिक कार्यासाठी नेहमी सहकार्याचे आश्‍वासन मान्यवरांनी दिले. तसेच गोशाळेतील गायींना चारा खाऊ घालण्यात आला. या वेळी संगीता कलंत्री, जगदीश जाखेटे, अ‍ॅड.राहुल झंवर, विनोद न्याती, बी.जे.लाठी, अ‍ॅड.दीपक फाफट, मनीष लढ्ढा, सतीश तोष्णीवाल, ममता लढ्ढा, सिमरन कलंत्री, चिन्मय कलंत्री आदी उपस्थित होते.

Exit mobile version